एकही अर्ज दाखल नाही

नवी मुंबई : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता उमेदवारांना नामनिर्देशन पत्र देणे व स्विकारणेची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरु झाली असून ही प्रक्रिया गुरुवार २५ डिसेंबर व रविवार २८ डिसेंबर रोजीची सार्वजनिक सुट्टी वगळता २९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत व ३० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत सुरु असणार आहे.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवरांसाठी आवश्यक असलेले नामनिर्देशनपत्र व शपथपत्रांचे अद्ययावत नमुने उपलब्ध्‍ करुन देण्यात आले आहेत. उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती एकत्रितपणे कळावी यादृष्टीने उमेदवारांसाठी विशेष माहिती पुस्तिका तयार करण्यात आली असून ती सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांकडे उपलब्ध्‍ ठेवण्यात आली आहे. यामध्ये नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रांचे नमुने आणि इतर नमुने उदा. उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज, निवडणूक प्रतिनिधी व मतदान प्रतिनिधी नेमणूकीचे नमुने, मतपत्रिकेवर नाव छापण्याचा नमुना, पक्षाच्या उमेदवाराने सादर करावयाचे जोडपत्र १ व जोडपत्र २ नमुना अशा विविध माहितीचा व नमुन्यांचा अंतर्भाव या माहिती पुस्तिकेमध्ये आहे.

त्याचप्रमाणे आदर्श आचार संहितेबाबत एकत्रित आदेश, अर्हता – अनर्हता, प्रभागनिहाय आरक्षणाची आदी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाचा पत्ता व नेमून दिलेले प्रभाग, प्रसार माध्यम सनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश अशाही विविध आदेशांचा समावेश या पुस्तिकेमध्ये आहे. रु.१००/- इतक्या दराने ही उमेदवारांसाठीची माहितीपुस्तिका निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध्‍ आहे.

२३ डिसेंबर रोजी आठ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून १००५ नामनिर्देशनपत्रे वितरीत झाली असून २४ डिसेंबरला ६०३ इतकी नामनिर्देशनपत्रे नेण्यात आली आहेत. यामध्ये बेलापूर विभागातून ५२, नेरुळ १०२ , वाशी ९०, तुर्भे ९६, कोपरखैरणे १११, घणसोली ७५, ऐरोली ४७ व दिघा ३० याप्रमाणे नामनिर्देशनपत्रे वितरण झाले आहे. कोणतेही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. २५ डिसेंबरपूर्वी जाहिर केल्याप्रमाणे नामनिर्देशनपत्र वितरण व दाखल करणे ही प्रक्रिया होणार नाही याची कृपया संबधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *