स्मशानभूमीत अघोरी करणीचा व जादूटोण्याचा भयंकर प्रकार उघडकीस

अनिल ठाणेकर

सांगली : कामेरी ता.वाळवा येथील सरकारी दवाखान्यासमोरील स्मशानभूमीत अघोरी करणीचा व जादूटोण्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ दखल घेऊन नागरिकांचे प्रबोधन केले. याबाबत सविस्तर माहिती अशी सकाळी कामेरी गावात स्मशानभूमीत करणी व जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आणि हे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना ही बातमी समजताच कार्यकर्त्यांनी कामेरीच्या स्मशानभूमीकडे तात्काळ धाव घेतली. महा.अंनिसचे राज्याचे कार्याध्यक्ष संजय बनसोडे, जिल्हा प्रधान सचिव डॉ राम घुले, अजय भालकर, विनोद मोहिते, बाळासाहेब पाटील, दिलीप क्षीरसागर, आरती सावंत, स्नेहल सूर्यवंशी, अमृत काळे आदी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत,त्यांचे प्रबोधन केले. त्यांनी करणी,जादूटोण्याचे साहित्य गोळा केले. स्मशानभूमीतील झाडाला काळया कपड्यात दोन गाढोटी होत्या.त्यामध्ये  काळया बाहुल्या, करणीचे साहित्य आढळून आले. तर स्मशानभूमीच्या कठड्यावर एका मोठ्या मडक्यात काळी बाहुली,पन्नास लिंबू,त्यातील काही कापलेले होते, अबीर बुक्का, हळद, कुंकू टाकलेले होते. कोहळा,पपई,उडीद, कणीक, काळे,हिरवे कापड, कापडी स्कार्फ, फुलांचा गजरा,पितळेचे लोखंडाचे खिळे, खेळांचे अनेक प्रकार, नारळ, हिरव्या बांगड्या,खिळे मारलेल्या बाहुल्या, लालमणी कवड्या, बेलाच्या काटक्या, काळे तीळ,वेलीची चुंबळ तसेच कोंबड्या बकऱ्यांचे काळजाचे तुकडे ही होते,सदरचा प्रकार भयावह वाटत होता. यातील बरेचसे साहित्य एका मडक्यात भरले होते. दोन पपयांना अनेक खेळे मारले होते. खूपच मोठ्या प्रमाणात साहित्य होते. एखाद्या महिलेवर ही करणी,जादूटोणा करण्याच्या इराद्याने कोणत्यातरी मांत्रिकाने हा प्रकार करायला लावला असावा असा अंदाज आहे. करणी करणारा संशयित येथीलच असावा असा संशय येतो. लोकांची भीती घालविण्यासाठी या साहित्याचे जाहीर दहन करण्यात आले.यावेळी राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे म्हणाले की, कामेरी गाव हे क्रांतिकारकाचा आणि सत्यशोधकी विचाराचा वारसा असणारे गाव आहे, अशा गावात हा प्रकार होतो आहे ही निषेधार्य गोष्ट आहे.  असा जादूटोणा किंवा करणीचा प्रकार करून कोणत्याही व्यक्तीचे कसल्याही प्रकारचं नुकसान होत नाही किंबहुना असे प्रकार करून कुणाचे चांगले होत नाही. असे अघोरी प्रकार करणाऱ्या मांत्रिक,बुवाबाबाचा आम्ही शोध घेत आहे,गावातील लोकांनी अशा अंधश्रद्धांना, करणींना अजिबात घाबरता कामा नये. खरे तर गावातील तरुणांनी स्वतःच पुढाकार घेऊन अशा गोष्टी बाजूला केल्या पाहिजेत निर्भयपणे अशा करणी जादूटोणा करणाऱ्या लोकांना प्रतिबंध केला पाहिजे” अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रधान सचिव डॉक्टर राम घुले म्हणाले, “अज्ञात व्यक्तीने दुष्ट हेतूने केलेला हा प्रकार निंदनीय असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल. अशा घटनेला घाबरून जाऊ नये. अशी कोणतीही अघोरी विद्या अस्तित्वात असत नाही. असा प्रकार आढळल्यास अंनिसच्या कार्यकर्त्यांची संपर्क साधावा.” विनोद मोहिते म्हणाले, “आम्ही पुढील दोन दिवसात गावात जाहीर सभा घेऊन ग्रामस्थांचं प्रबोधन करून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम करणार आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *