पणजी (गोवा): जागतिक मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शोध मराठी मनाचा’ या संकल्पनेवर आधारित २९वे जागतिक मराठी संमेलन येत्या १० व ११ जानेवारी २०२६ रोजी गोव्यातील कला अकादमीपणजी येथे आयोजित करण्यात आले आहे. मराठी भाषा, साहित्य, कला, संस्कृती आणि आधुनिक विचारप्रवाह यांचा सखोल शोध घेणारे हे संमेलन ठरणार आहे, अशी माहिती जागतिक मराठी अकदामीचे कार्याध्यक्ष उदय सावंत यांनी दिली.

मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अकादमीचे खजीनदार किशोर रांगणेकर, ज्येष्ट पत्रकार महेश म्हात्रे, उदय तानपाठक उपस्थित होते.

या संमेलनाचे आयोजन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असून, विविध क्षेत्रातील नामवंत साहित्यिक, विचारवंत, कलाकार, अभ्यासक आणि तज्ज्ञ यांचा सहभाग लाभणार आहे. साहित्य, नाट्य, चित्रपट, संगीत, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यटन, अर्थव्यवस्था, माध्यमे आणि समाजजीवन अशा विविध विषयांवर परिसंवाद, चर्चा व सादरीकरणे होणार आहेत.

संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच महाराष्ट्र व गोवा सरकारमधील मंत्री, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि देश-विदेशातील मराठी प्रतिनिधी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत

तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात काव्यसंमेलन, कथाकथन, नाट्यप्रयोग, चित्रपटविषयक चर्चा, कृत्रिम बुद्धिमत्ता व मराठी भाषा, माध्यमे व समाजमाध्यमे, पर्यटन व सांस्कृतिक बदल, तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत भारत व मराठी माणूस यांसारख्या विषयांवर सखोल मंथन केले जाणार आहे. समारोपप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महेश म्हात्रे यांनी दिली.

मराठी अस्मिता, आधुनिकता आणि जागतिक स्तरावरील मराठी माणसाचे स्थान अधोरेखित करणारे हे संमेलन मराठी भाषेच्या वैचारिक प्रवासाला नवी दिशा देणारे ठरणार असल्याचे उद्य तानपाठक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *