ठाणे –
नौपाडा परिसरात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून प्रभागातील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपचे उमेदवार मा. संजय संतू वाघुळे हे सध्या प्रचारात एकटेच सक्रिय असल्याचे दिसत असून त्यांच्या पॅनलमधील इतर उमेदवारांशी मतभेद वाढल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
वाघुळे यांच्या पॅनलमधील माजी नगरसेवक आणि उमेदवार सुनेश जोशी आणि मृणाल पेंडसे यांच्याशी त्यांचे मतभेद उघडपणे दिसत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. त्यामुळेच भाजपचे उमेदवार संजय संतू वाघुळे हे सध्या एकट्याने प्रचार करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या पॅनलमधील सुनेश जोशी आणि मृणाल पेंडसे हे त्यांना नकोसे झाले असून, त्या दोघांना पराभूत करण्यासाठीच वाघुळे प्रचार करत आहेत ही बाब आता नौपाड्यातील जनतेपासून लपून राहिलेली नाही.तसेच माजी नगरसेविका प्रतिभा माधवी यांच्याशीही वाघुळे यांचे राजकीय संबंध सध्या तणावपूर्ण असल्याची माहिती स्थानिक पातळीवर चर्चेत आहे. यामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून येऊनही मा. संजय वाघुळे यांचे कार्य अपेक्षेप्रमाणे समाधानकारक नसल्याची भावना काही नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. याआधी त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार नसल्यामुळे ते निवडून येत होते, मात्र यावेळी परिस्थिती वेगळी असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
यंदाच्या निवडणुकीत नौपाड्यातील जनतेला तुषार रसाळ यांच्या रूपाने एक सक्षम, विश्वासार्ह आणि मजबूत पर्याय मिळाल्याचे बोलले जात आहे. पॅनलमधील अंतर्गत मतभेदांमुळे वाघुळे यांच्याविरोधात वातावरण तयार होत असून इतर उमेदवारांचा अप्रत्यक्ष पाठिंबा तुषार रसाळ यांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकूण परिस्थितीचा आढावा घेतला असता, नौपाडा प्रभागात राजकीय समीकरणे बदलली असून तुषार रसाळ यांचा विजय निश्चित मानला जात असल्याचे संकेत मिळत आहेत, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.
