दिव्यातून आरोपीच्या दुचाकीच्या डिक्कीत मिळाले जिवंत हॅण्डग्रेनेड
० बॉम्बशोधक पथकाकडून हॅण्डग्रेनेड निकामी ०
आरोपी विश्वकर्माला पोलिसांकडून अटक
अशोक गायकवाड
ठाणे : महानगर पालिकेची धामधूम शिगेस पोचली असताना ठाणे जिल्हायतून खळबळजनक बातमी आहे. ठाणे जिल्ह्यातील दिव्यातून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असता त्याच्या दुचाकीच्या डिकीतून त्यांना चक्क जिवंत हॅण्डग्रेनेड सापडला आणि एकच खळबळ उडाली. गुन्हेगारांकडे पिस्तुल चाकू सुरा सापडण्याची सवय असलेल्या पोलिसांना हा हॅण्डग्रेनेड सापडल्यामुळे सगळ्या यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. या जिवंत हॅण्डग्रेनेडला बॉम्बशोधक पथकाने निकामी केले असून निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर काही घातपात करण्याचा आरोपीचा इरादा होता का याची कसून चौकशी केली जात आहे. हा हॅण्डग्रेनेड या आरोपीकडे आलाच कसा या प्रश्नाने साऱ्यांनाच चक्रावून सोडले आहे.
एका महिलेवर गोळीबार झाल्याच्या प्रकरणात मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी दिव्यातून या आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर या आरोपीकडील दुचाकीची तपासणी कराता त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत एक जिवंत हॅण्ड ग्रेनेड मिळाल्याने खळबळ उडाली आहे. बॉम्ब शोधक, नाशक पथकाने हॅण्डग्रेनेड निकामी केले असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीकडे हॅण्डग्रेनेड आले कोठून? याचा तपास पोलीस करीत आहेत.
दिव्यातील साबेगावमध्ये राहणारा आरोपी शिवशंकर राममुरत विश्वकर्मा उर्फ बबलू याच्याविरुद्ध मुंबईतील पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात शिक्षा भोगल्यानंतर हा आरोपी दिव्यात राहण्यास आला. २ जानेवारी रोजी त्याने एका महिलेवर गोळीबार केल्याची तक्रार मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील वालिव पोलिसांकडे आली होती. तांत्रिक विश्लेषणानंतर शिवशंकर दिव्यातील साबेगाव येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस दिव्यात धडकले. आणि या आरोपीला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने गोळीबार केल्याची कबुली दिली. आरोपीने गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर दुचाकीच्या सीटखालील डिक्कीमध्ये एक जुने हॅण्ड ग्रेनेड मिळाले. वालिव पोलिसांनी ही माहिती मुंब्रा पोलिसांना दिली. घटनास्थळी ठाणे पोलिसांचे बॉम्ब शोधक, नाशक पथक दाखल झाले. या पथकाने हॅण्ड ग्रेनेडची तपासणी केल्यानंतर हॅण्ड ग्रेनेड जिवंत असल्याची बाब स्पष्ट झाली.
नंतर संबधित हॅण्ड ग्रेनेड निकामी करण्यात आले. वालिव पोलिसांच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सध्या आरोपी चौकशीसाठी वालिव पोलिसांच्या ताब्यात आहे. स्फोट घडवून आणण्यासाठी किंवा मानवी जिवीतास तसेच मालमत्तेस धोको पोहोचवण्याच्या हेतून आरोपीने हॅण्ड ग्रेनेड बाळगल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
