मुंबई : सन २०२६ अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ८ हजार नवीन बसेस दाखल होतील अशा पद्धतीने सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीने गतिमान करण्यात यावी. यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा. प्रताप सरनाईक यांनी दिला.
ते एसटी महामंडळाच्या सन २०२५–२६ च्या अर्थसंकल्पीय निधीच्या वापराबाबत बोलावलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, आर्थिक सल्लागार गिरीश देशमुख तसेच संबंधित खातेप्रमुख उपस्थित होते.
यावेळी मंत्री सरनाईक यांनी एसटीच्या विविध विभागांकडून सुरू असलेल्या संथ व कूर्मगती कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
