रिक्षांवर बॅनर्सव्दारे मतदानाबाबत जनजागृती आणि रिक्षा चालकांनीही मतदान करावे याकरिता सुसंवाद
नवी मुंबई : १५ जानेवारी रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा या करिता सर्व नागरिकांपर्यंत मतदान करा व शहर विकासात आपले योगदान द्या असे आवाहन वेगवेगळया स्वरुपात केले जात आहे. निवडणूकीच्या ‘स्वीप उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त समाज घटकांपर्यंत पोहचण्यासाठी विशेष पथके विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत.
अशाचप्रकारे ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत विविध विभागातील रिक्षाचालक यांच्याशी सुसंवाद साधत लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा हक्क त्यांनी व त्यांच्या मित्र परिवाराने नक्की बजावावा असे आवाहन करण्यात येत आहे. मतदानाचे कर्तव्य बजावून आपण आपले काम करु शकतो, त्यामुळे कोणीही मतदान करण्याचे टाळू नये असे रिक्षाचालकांना सांगतानाच या वर्षी पहिल्यांदाच १ ते २७ प्रभागात ४ जागांसाठी व २८ व्या प्रभागात ३ जागांसाठी मतदान कसे करायचे या विषयीची माहिती व मतदानाची पध्दती त्यांना सांगण्यात आली. या विषयी त्यांच्या मनात असलेल्या शंकांचेही समाधान करण्यात आले.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ५०० हून अधिक रिक्षांच्या पाठीमागील बाजूस १५ जानेवारी रोजी होणा-या निवडणूकीत प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावावा अशा आशयाचे फलक लावण्यात आले असून रिक्षाच्या दोन्ही बाजूकडील पॅनलवर बहुसदस्यीय पध्दतीत मतदान कसे करायचे याची चित्रांकित माहिती बॅनर्स स्वरुपात निवडणूक यंत्राच्या छायाचित्रासह प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मध्ये स्वीप उपक्रमांतर्गत संपूर्ण महापालिका क्षेत्रात व्यापक जनजागृती करण्यात येत असून बहुसदस्यीय पॅनल पध्दतीत मतदान कसे करायचे याविषयी जनजागृतीही करण्यात येत आहे.
