ठाणे : लांबूनच पाहून तोंडाला पाणी सुटेल, असा चविष्ट असणारा रानमेवा बाजारात दाखल होऊ लागला आहे. उन्हाची दाहकता वाढत आहे. अशातच बाजारात रसरशीत अशी जांभूळ, ताडगोळे, करवंद आणि जाम ही फळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
सध्या बाजारात जांभूळ, ताडगोळे, करवंद आणि जाम, चिंच, आवळा, छोटा आवळा, तोतापुरी कैरीचा दरवळ सुटला आहे. ग्राहक वर्ग आवडीने या फळांची खरेदी करत आहेत. कर्जत, पालघर, तारापूर आणि भाईंदर येथून ही फळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. रसरशीत जांभूळ सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. जांभळामधील काही गुणधर्मामुळे ब्लड शुगर, ब्लड प्रेशर नियंत्रणात येते. तसेच वाढत्या गर्मीमुळे पाणीदार, आंबट, तुरट आणि गोड चवीच्या फळाची मागणी वाढू लागली आहे.
भरपूर प्रमाणात जीवनसत्व देणारा आवळा हा ८० रुपये किलोने विक्री होत आहे. आवळ्याचे लोणचे, आवळ्याचा पेठा तयार करण्याकरिता महिला वर्गांची अधिक पसंती दिली आहे. सफरचंद, केळी, डाळिंब, कलिंगडावर सुखावणारे ग्राहक आता रानफळे खरेदी करताना दिसत आहेत.
फळांचे दर न परवडणारे
इतर फळांच्या तुलनेत रानफळांच्या किमती जास्त आहेत; मात्र वाढत्या गरमीमध्ये शरीरास आरोग्यदायक फळे असल्याने ग्राहकांची मागणी आहे. ताडगोळे १५० ते १६० रुपये डझन, जांभूळ ८० ते १०० रुपये पाव किलो तर जाम ५० रुपये किलो अशा किमतीत सध्या बाजारात उपलब्ध आहेत. ग्राहक वर्ग आवडीने या सर्व फळांची खरेदी करत आहेत. रानफळे आम्ही वसईवरून घेऊन आलो आहोत. सध्या उन्हाळा चालू असल्याने यामध्ये विशेषतः कैरी व आवळ्याची खरेदी अधिक केली जात आहे. यापासून कोणी लोणचे तयार करत आहे तर कोणी मुरांबा तयार करण्यासाठी घेऊन जातात.
