मनोरुग्णता विषयक अपंगत्व प्रमाणपत्र प्रक्रियेवर
राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात १६ जानेवारी रोजी ‘क्लिनिकल मीट’
ठाणे : मनोरुग्णता क्षेत्रात अपंगत्व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक शास्त्रीय, व्यावहारिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम व्हावी, या उद्देशाने राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा यांच्या वतीने बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटीच्या सहकार्याने विशेष क्लिनिकल मीटचे आयोजन करण्यात आले आहे.
“मनोरुग्णतेतील अपंगत्व प्रमाणपत्र प्रक्रिया (Disability Certification in Psychiatry)” या विषयावर आधारित ही शैक्षणिक कार्यशाळा शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील मेडिसिन लेक्चर हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली सौरभ कदम, तसेच बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटीच्या अध्यक्ष व भाभा अणुसंशोधन केंद्राच्या मनोरुग्णता विभागाच्या प्रमुख डॉ. शोभा नायर असणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी २.०० वाजता होणार असून त्यानंतर शैक्षणिक सत्रांना सुरुवात हाेणार आहे.
उद्घाटनानंतर डॉ. अमेय पुसाळकर “अपंगत्व – ओळख व कायदेशीर चौकट” या विषयावर मार्गदर्शन करणार असून, मनोरुग्णतेतील अपंगत्वाची संकल्पना व विद्यमान कायदे व नियमावली यांची माहिती दिली जाणार आहे. या सत्राचे अध्यक्षपद डॉ. स्वप्नाली कदम व डॉ. शोभा नायर भूषवणार आहेत. तद्नंतर डॉ. आश्लेषा ढोले यांचे “मानसिक आजारांचे मूल्यमापन व प्रमाणपत्र प्रक्रिया” या विषयावर व्याख्यान होणार असून, प्रमाणित मोजमाप पद्धती, दस्तऐवजीकरण व प्रक्रिया यांवर भर दिला जाणार आहे. तसेच डॉ. शीतल मेश्राम “न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर्ससाठी मूल्यमापन साधने” या विषयावर सादरीकरण करणार आहेत. तसेच यावेळी “अपंगत्व प्रमाणपत्र प्रक्रियेत येणाऱ्या दैनंदिन अडचणी” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
