पाकिस्तानच्या ९ जणांना अटक
कोस्ट गार्डची धडक कारवाई
भारतीय सागरी हद्दीत घुसखोरीचा संशय
पोरबंदर : मुंबईत एन निवडणूकीची धामधूम सुरु असतानाचा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून काही शेकडो मैल अंतरावर अरबी समुद्रात कोस्ट गार्डने थरारक पाठलाग करून पाकिस्तानची अल मदीना बोट ताब्यात घेतली आहे. भारतीय सागरी हद्दीत घुसखोरी करणाऱ्या या बोटीवरील ९ पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली असून भारतीय रॉ आणि इतर संस्थांकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मुंबईवरील हल्ल्यासाठी पाकिस्तानातून अशाच जलमार्गाचा वापर करण्यात आला होता.
पाकिस्तानकडून पुन्हा एकदा समुद्रमार्गे भारतात घुसखोरी करून मोठी कारवाई घडवण्याचा कट तर नव्हता ना, असा गंभीर प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे. ‘अल मदीना’ ही बोट भारतीय सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे घुसल्याचा संशय असून, प्राथमिक चौकशीसोबतच सुरक्षा यंत्रणांकडून संयुक्त तपास सुरू करण्यात आला आहे.
कोस्ट गार्डच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित गस्तीदरम्यान भारतीय सागरी हद्दीत संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानंतर एका पाकिस्तानी मासेमारी बोटीचा मागोवा घेण्यात आला. कोस्ट गार्डने बोटीला थांबण्याचा सिग्नल दिल्यानंतरही बोटीने पाकिस्तानच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोस्ट गार्डने पाठलाग करत बोट रोखून बोर्डिंग ऑपरेशन राबवले आणि ‘अल मदीना’ ताब्यात घेतली.
कारवाईनंतर कोस्ट गार्डने बोटीवरील एकूण ९ क्रू मेंबर्सना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून प्राथमिक चौकशी सुरू असून, बोटीचे कागदपत्र, GPS रेकॉर्ड, नेव्हिगेशन लॉग, संपर्क साधनं, सॅटेलाइट फोन/रेडिओ उपकरणं आदींची तपासणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, बोट नेमकी कोणत्या मार्गाने भारतीय हद्दीत आली, तिचे लक्ष्य काय होते, तसेच बोटीवर अन्य कोणती प्रतिबंधित सामग्री आहे का, याबाबत सखोल चौकशी केली जात आहे.
कोस्ट गार्डने ताब्यात घेतलेली ही बोट पुढील तपासासाठी पोरबंदर बंदराकडे टो करून नेण्यात आली आहे. तेथे रम्मेजिंग ऑपरेशन म्हणजेच बोटीची सखोल झडती घेतली जाणार आहे. बंदरात आणल्यानंतर संबंधित एजन्सीजकडून फॉरेन्सिक तपासणी, तसेच संशयितांच्या चौकशीसाठी विशेष पथक कामाला लागणार असल्याचे समजते.
या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा पूर्णतः सतर्क झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांत समुद्रमार्गे तस्करी, घुसखोरी, बनावट नोटा/अमली पदार्थांची ने-आण, तसेच गुप्त हालचाली करण्याचे प्रकार घडल्याची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ‘अल मदीना’ प्रकरणातही केवळ बेकायदेशीर प्रवेश इतक्यापुरते प्रकरण मर्यादित आहे की त्यामागे मोठा कट आहे, याचा शोध घेण्यासाठी तपासयंत्रणा कसोशीने तपास करत आहेत.
