विरार :- विधानसभेत भाजपाकडून पत्कराव्या लागलेल्या नामुष्कीजनक पराभवाचा वचपा हितेंद्र ठाकूरांनी आज वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणूकीत काढला.बहुजन विकास आघाडीने एकूण ११५ जागांपैकी ७१ जागांवर विजय मिळवित एकहाती सत्ता काबीज केली. भाजपाने ४३ जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले. उर्वरित पक्षांना एकही जागा मिळालेली नाही.
या विजयासह वसई–विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता कायम राहिली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपला गड यशस्वीपणे राखत पुन्हा एकदा पक्षाची ताकद सिद्ध केली आहे. अनेक प्रभागांमध्ये चारच्या पॅनलने विजय मिळवत बविआने वर्चस्व प्रस्थापित केले.
या निकालामुळे वसई–विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची राजकीय पकड अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात महापालिकेच्या कारभारावर बविआचा ठसा अधिक ठळकपणे दिसणार आहे.
