मुंबईतील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार.
मुबई : महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे २४ नगरसेवक विजयी झाले आहेत. या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस व मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकाबाजूला धनशक्ती होती, प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे वाटण्यात आले, विरोधी पक्षाला धमक्या देण्यात आल्या. सर्व यंत्रणा सत्ताधारी पक्षासाठी काम करत होती तर दुसऱ्या बाजूला जनशक्ती होती. जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवत २४ नगरसेवक निवडून दिले आहेत. अत्यंत विपरित परिस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या निर्धाराने लढले आहेत. आमची संख्या कमी असली तरी मुंबईकरांच्या प्रश्नावर महापालिकेत आवाज उठवतील व जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील. मुंबईकरांना चांगले रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी, वाहतुक कोंडीतून सुटका, बेस्ट बसची चांगली सुविधा, प्रदुषणमुक्त मुंबई करायची आहे. महापालिकांच्या विविध संस्थांमध्ये खाजगीकरणाचा सपाटचा सुरु आहे त्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे काम केले जाईल. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावही अंकुश ठेवण्याचे कामही या नगरसेवकांच्या माध्यमातून केले जाईल, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
एका प्रश्नाला उत्तर देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपात हुकूमशाही आहे तर काँग्रेसमध्ये लोकशाही आहे, आमच्या पक्षात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. कोणी टिका केली असेल तर पक्ष त्यावर निर्णय घेईल. पक्षाने मला मुंबईच्या अध्यक्षपदाची संधी दिली आहे, माझ्या कार्यकर्त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. येणाऱ्या काळात मुंबईत काँग्रेस पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचे काम आम्ही करणार आहोत असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. “आमच्या नगरसेवकांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे त्यांना कोणत्या हाॅटेलमध्ये ठेवण्याची गरज वाटत नाही”, असा टोलाही खासदार वर्षा गायकवाड यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *