दोन वर्ष महापौर पद अन्यथा भाजपा विरोधात बसणार ०  मुंबई महापौरपदवरून तिढा कायम

सिध्देश शिगवण

ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने एकहाती बहुमत मिळवले असतानाही भाजपाने ठाणे महापौर पदावर दावा ठोकल्याने नवा व्टिस्ट आला आहे.ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपाची महायुती होती. त्यामुळे शिवसेनेच्या यशात आमचाही वाटा आहे असा दावा करीत दोन वर्षांसाठी महपौर द्या अन्यथा आम्ही विरोधात बसू अशी भुमिका भाजपा नेते निरंजन डावखरे यांनी जाहीर केली आहे.

ठाण्यात जागा वाटपात भाजपने नमते घेतले होते, आता भाजपचा ठाण्यात १०० टक्के स्ट्राईक रेट आहे, तेव्हा जनतेला दिलेला शब्द पाळायचा असेल तर भाजपला महत्वाची पदे मिळायला हवीत. नाही तर विरोधी बाकावर बसून सत्तेवर अंकुश ठेवू, असा इशारा भाजपचे आमदर संजय केळकर आणि ठाणे निवडणुक प्रभारी आमदार निरंजन डावखरे यांनी दिल्याने ठाण्यात तिढा वाढला आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये अखेरच्या क्षणी युती झाली. बिनविरोध निवडी मुळे गाजलेल्या या निवडणुकीत शिंदे गटाने ८७ जागा लढवुन ७५ जिंकल्या तर, भाजपने ३९ लढवुन २८ जागा जिंकल्या होत्या.

निकालात ठाणे महापालिकेत शिंदेंची शिवसेना क्रमांक एकचा तर, भाजप क्रमांक दोन चा पक्ष ठरला आहे. शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांनी युतीत निवडणूक लढविली असून त्यांच्या १३१ पैकी १०३ जागा निवडून आल्याने महायुतीचा महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले. पण आजच्या भाजपाच्या भुमिकेने राजकारणात टिवस्ट आला. ठाणेकरांना भाजपने निर्धारनाम्यातुन अनेक आश्वासने दिली आहेत. त्यामूळे ठाणेकरांना दिलेला हा शब्द पुर्ण करण्यासाठी महापौर पदासह महत्वाची पदे आमच्या पक्षाला द्यावीत. नाही तर, विरोधी बाकावर बसु, पारदर्शक प्रशासनासाठी चौकीदाराची भूमिका बजावू. असा इशारा देत याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही कळविले असल्याचे आ. डावखरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजपच्या या पवित्र्यावर शिंदेच्या सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना छेडले असता त्यांनी, आ. निरंजन डावखरे हे भाजपाचे ठाण्यातील नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षातील नगरसेवकांना जास्तीत जास्त पदे कशी देता येतील, हे पाहणे त्यांचे काम आहे आणि त्यानुसार त्यांनी महापौर पदाची मागणी करणे गैर नाही. तरीही, याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असेही म्हस्के म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *