मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
ठाणे: मराठी भाषेचे जतन, संवर्धन तसेच नव्या पिढीमध्ये भाषेविषयी प्रेम व अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ‘मराठी भाषा पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने महापालिकेच्या शाळांमध्ये विविध शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.
या उपक्रमांतर्गत उद्या बुधवार, २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वा. ज्येष्ठ कवी व साहित्यिक अरुण म्हात्रे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले असून ते ‘जगणे व्हावे गाणे’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे, यासाठी ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषयावर निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळणार आहे. मराठी साहित्य परंपरेचा गौरव करण्यासाठी मंगळवार २७ जानेवारी सायंकाळी ४.०० वा. मराठी कवी संमेलनाचे आयोजन महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आले आहे यामुळे साहित्यप्रेमींना समकालीन मराठी काव्याचा आस्वाद घेता येणार आहे. मराठी भाषा पंधरवड्याच्या समारोपाच्या दिवशी दिनांक २8 जानेवारी रोजी सकाळी १०.०० वा. ठाणे महापालिका परिसरात ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. या दिंडीच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीचा प्रसार, ग्रंथांचे महत्त्व आणि मराठी साहित्याची समृद्ध परंपरा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
