यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध ८८ शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरू
हरिभाऊ लाखे
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ११ विद्याशाखेंतर्गत असलेल्या विविध ८८ शिक्षणक्रमांचे शैक्षणिक सत्र जानेवारी २०२६ करीता नवीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात आलेले आहेत. तसेच जानेवारी २०२५ या सत्रात ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षास प्रवेश घेतलेला आहे; अशा विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाचीही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. विनाविलंब शुल्कासह ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठीची अंतिम मुदत ही येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण व विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी. एड. (सेवांतर्गत), बी. एड. (विशेष) तसेच विज्ञान विद्याशाखेच्या शिक्षणक्रमांव्यातिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी जानेवारी २०२६ या सत्राकरिता प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांना नियमित पदवी सोवत दूरशिक्षणाद्वारे अधिकची एक पदवी घेता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी दिली आहे.
‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापनेपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजातील विविध घटकातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यातून अनेक विद्यार्थी प्रशासकीय व खाजगी संवेत उच्चपदावर कार्यरत आहेत. मानाची पदे भूषवत आहेत. हे विद्यापीठ सर्वसामान्य ते विशेष पारंगत अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रवेशद्वार ठरत आलेले आहे. येथे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख तसेच वेब रेडिओ, दृकश्राव्य माध्यम व मोबाईलद्वारे देखील मार्गदर्शन केले जाते. दोन वेळा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, दूरशिक्षण क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य यूजीसी मान्यताप्राप्त व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचलेले एकमेव मुक्त विद्यापीठ आहे. विद्यापीठातर्फे सेनादल सैनिक, बंदीजन, कृषि सेवक, शेतमजूर आणि समाजातील इतरही घटक यांच्यासाठी विशेष शिक्षणक्रम आहेत. शिवाय ए.आय. डाटा सायन्स, सायबर ॲक्ट ते बीए, बीकॉम, एम. ए., एम. कॉम., एम. लिब., एम. सी. ए. यासह विविध व आधुनिक कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. हे सर्व शिक्षणक्रम नोकरदारांना आपली नोकरी व व्यवसायिकांना आपला व्यवसाय सांभाळून पूर्ण करता येतात. त्यामुळे संबंधित इच्छुकांना आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची व सर्वार्थाने प्रगती साधण्याची संधी उपलब्ध होत आहे.
त्या अनुषंगाने दिनांक २० जानेवारी २०२६ पासून विद्यापीठाच्या ११ विद्याशाखेंतर्गत विविध ८८ शिक्षणक्रमांचे ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात आले आहेत. त्यात प्रमाणपत्र – ३२, पदविका – ३०, पदवी – ११ व पदव्युत्तर १५ शिक्षणक्रमांचा समावेश आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही फक्त ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्र्माचे शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल. प्रवेशासाठीची अंतिम मुदत ही येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या विहित मुदतीत विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac  या वेबसाईटला भेट द्यावी. तेथे Admission  या पर्यायावरून Prospectus येथे विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत. काही तांत्रिक अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत (०२५३)२२३०५८०, २२३१७१५, २२३०१०६, २२३१७१४ या विद्यार्थी मदत केंद्रावरील दूरध्वनी क्र्मांकावर किंवा ९३०७५७९८७४, ९३०७५६७१८२ अथवा ९२७२०४६७२५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि लवकरात लवकर प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे व विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *