विश्वनाथ स्पोर्ट्स मीट स्पर्धा
नेस वाडिया व भारती विद्यापीठ उपांत्य फेरीत दाखल
लोणी काळभोर: आठव्या राष्ट्रीय स्तरावरील विश्वनाथ क्रीडा स्पर्धा (व्हीएसएम–२०२६) अंतर्गत मंगळवारी पुण्यात खेळल्या गेलेल्या क्रिकेटच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांत नेस वाडिया महाविद्यालय आणि भारती विद्यापीठ यांनी प्रभावी विजय नोंदवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नेस वाडिया महाविद्यालयाने एमईएस वाडिया, पुणे संघावर ४२ धावांनी मात करत उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. प्रथम फलंदाजी करताना नेस वाडिया महाविद्यालयाने २० षटकांत ४ बाद १८६ धावांची भक्कम धावसंख्या उभारली. सिद्धांत मेमाणेने ४५ चेंडूंमध्ये चार चौकार व दोन षटकारांसह ५७ धावांची प्रभावी खेळी केली, तर वेदांत डेडगेने ३६ चेंडूंमध्ये ५१ धावा करत त्याला मोलाची साथ दिली. एमईएस वाडियाकडून कर्णधार अभि जाधवने ३४ धावांत ३ बळी घेतले, मात्र प्रतिस्पर्ध्याची धावसंख्या मोठी ठरली.
१८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एमईएस वाडियाने झुंज दिली, परंतु आवश्यक धावगती राखण्यात अपयश आले. निरज निंबाळकर (५० चेंडूंमध्ये ५०) आणि प्रथमेश कुवर (३१ चेंडूंमध्ये ३७) यांनी प्रयत्न केले, तरी संघ २० षटकांत ६ बाद १४४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. नेस वाडियाकडून प्रणव लोखंडेने ४ षटकांत २० धावांत ३ बळी घेत निर्णायक गोलंदाजी केली.
दरम्यान, याच मैदानावर झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारती विद्यापीठ संघाने व्हीआयटी पुणेवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना व्हीआयटी पुणे संघाला भारती विद्यापीठाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर संघर्ष करावा लागला आणि १७ षटकांत ६ बाद १२३ धावाच करता आल्या. सोहम कदमने नाबाद ३० धावा केल्या, तर हर्ष शेळके आणि कूश पाटील यांनी प्रत्येकी २६ धावांचे योगदान दिले. भारती विद्यापीठाकडून मयूर आवटेने ४ षटकांत ३० धावांत ३ बळी घेत प्रभावी कामगिरी केली.
१२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारती विद्यापीठाच्या सलामीवीरांनी कोणतीही अडचण न येऊ देता सामना एकतर्फी केला. विजय जाधवने ४२ चेंडूंमध्ये ८ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ६४ धावा केल्या, तर ओंकार एस. मोहोळने ३० चेंडूंमध्ये ७ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५१ धावा करत अवघ्या १२ षटकांत एकही विकेट न गमावता संघाचा विजय निश्चित केला.
संक्षिप्त धावफलक :
उपांत्यपूर्व फेरी:
नेस वाडिया कॉलेज – २० षटकांत १८६/४ (सिद्धांत मेमाणे ४५ चेंडूंमध्ये ५७, वेदांत डेडगे ३६ चेंडूंमध्ये ५१; अभि जाधव ३/३४) वि.वि. एमईएस वाडिया, पुणे – २० षटकांत १४४/६ (निरज निंबाळकर ५० चेंडूंमध्ये ५०, प्रथमेश कुवर ३१ चेंडूंमध्ये ३७; प्रणव लोखंडे ३/२०) सामनावीर: प्रणव लोखंडे
व्हीआयटी पुणे – १७ षटकांत १२३/६ (सोहम कदम* १९ चेंडूंमध्ये ३०, हर्ष शेळके २६, कूश पाटील २६; मयूर आवटे ३/३०) पराभूत वि. भारती विद्यापीठ – १२ षटकांत १२७/० (विजय जाधव* ४२ चेंडूंमध्ये ६४, ओंकार एस. मोहोळ* ३० चेंडूंमध्ये ५१) निकाल : विजय जाधव.
