संभाजीनगरमध्ये शिवसेनेसोबतची युती तोडा
भाजपा कार्यकर्त्यांनी मंत्र्यांची गाडी अडवली
संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची अखेर युती झाली आहे. शिवसेना २५ तर भाजप २७ जागा लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट तर भाजपकडून बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी घोषणा केली. मात्र, युतीच्या घोषणेनंतर संभाजीनगरमध्ये राडा झाला. भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्यासमोर हात जोडले, तसेच त्यांच्या गाड्याही अडवल्या. साहेब, युती तोडा असे म्हणत भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले.
संभाजीनगरमधील शिवसेना-भाजपची ही युती जिल्ह्यातील केवळ सात तालुक्यात असणार आहे. मात्र, सोयगाव आणि सिल्लोड या दोन तालुक्यातील ११ ठिकाणी युती न करता शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांचा जसा राडा झाला होता तसाच राडा आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या युतीच्या घोषणेनंतर त्याच ठिकाणी झाला. वैजापूर तालुक्यातील भाजपचे भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे थेट मंत्री अतुल सावे आणि भाजपचे आमदार खासदार यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच त्यांची गाडीही अडवली. त्यामुळे काही काळ राडा आणि गोंधळ पाहायला मिळाला. अखेर, पोलिसांच्या बंदोबस्तात मंत्री अतुल सावे निघून गेले.
वैजापूर तालुक्यातील आठ जागांपैकी केवळ तीन जागा भाजपला मिळाले आहेत. त्यामुळे, भाजप कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला, अनेक वर्षे आम्ही निवडणुकीची तयारी करीत होतो. मात्र, ती जागा शिवसेनेला गेली आणि तिथं भाजप नेत्यांना शिव्या देणारा व्यक्ती उमेदवार असणार आहे. त्यामुळं आता आम्ही त्यांच्यासाठी काम करायचं का? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
