पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार – सहर शेख
एमआयएमच्या नगरसेविकेचे आव्हाडांना आव्हान
ठाणे : पुढील पाच वर्षत संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार एमआयएमचा असेल. असे थेट आव्हान मुंब्य्रातील एमआयएमची नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख हिने स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिले आहे. आव्हाडांच्या राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यानंतर एमआयएममध्ये जाऊन उमेदवारी मिळवत जिंकलेल्या या सहाराने आणि तिच्या वडीलांनी आमदार आव्हाड यांनाच आव्हान देत निवडणूक जिंकली होती. या प्रभागात दोन्ही राष्ट्रवादीच्या मत विभाजनाचा फायदा एमआयएमला झाल्याचे दिसते. मागील निवडणूकीत मुंब्य्रात एमआयएमचे दोन नगरसेवक निवडून आले होते. परंतू, यंदा पाच विजयी झाले आहेत. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३० मधून असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाची सहर शेख ही तरुणी निवडून आली आहे. सहर शेख हिचे वडील युनूस शेख आणि राष्ट्रवादी (श.प.) काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. काही वर्षांपूर्वी जितेंद्र आव्हाड मुंब्रा येथे प्रचाराला गेले असताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या युनुस शेख यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यंदाच्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत युनुस शेख यांनी आपल्या मुलीसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, राष्ट्रवादीने उमेदवारी न दिल्यामुळे सहर शेख ही एमआयएमकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. ही निवडणूक जिंकल्यानंतर विजयी सभेत युनुस शेख आणि सहर शेख या बाप-लेकीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
आक्रमक भाषेत जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करताना म्हटले की, जितेंद्र आव्हाडला मी जे जे नाव ठेवले आणि तो महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. अल्लाहतालाने माझ्या मुलीला ‘हिजाबवाली बेटी’ म्हणून लोकप्रिय केले. आव्हाड यांनी इथून पुढे कोणत्याही मुलीच्या भविष्याशी खेळू नये. नाहीतर आमचा समाज एकत्र येऊन विकेट कशी पाडतो, हे बघितलं ना. तू माझ्या मुलीला उमेदवारी नाकारलीस, मी आता माझ्या मुलीला एमआयएममधून निवडून आणलं आहे. जर प्रभाग क्रमांक ३० मध्ये कुठलाही अडथळा निर्माण केला तर इथून काय-काय निघणार, याचा तू विचार सुद्धा करु शकत नाहीस. निवडणूक झालेली आहे मी सर्वांना माफ केले आहे. परंतु जे जे म्हणजे झुठा जितेंद्रला कदापी माफ करणार नाही, प्रभाग क्रमांक ३० मध्ये जर कधी फिरताना दिसला तर तुला दाखवतो, अशी थेट धमकी देत युनूस शेख यांनी जितेंद्र आव्हाडांना दिली आहे.
