मुंबई : मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही आणि बोलणारही नाही. माझे काही तत्व आहेत. माझ्यावर बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे जिथे अन्याय तिथे न्यायासाठी लढणारा माझा स्वभाव आहे, अजून खूप सत्य उघड व्हायचयं असा गर्भित इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता आज जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. ही सभा आटपून मुख्यमंत्र्यांनी साई मंदिरात जाऊन साई बाबांचे दर्शन घेतलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत असतांना त्यांनी वरील इशारा दिला.
राज्यात आज मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. त्यामुळे आम्ही त्यात व्यस्त असून विरोधकांना कुठलेही काम उरले नसल्याने ते केवळ टीका करत आहेत. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. आजवर एवढ्या खालच्या स्तराचं राजकारण कधी झालं नव्हतं. कुटुंबावर, महिलांवर खालच्या पातळीवरती टीका करणे, ही आपली संस्कृती नाही. असे असताना महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. अशा आरोपांना आम्ही उत्तर आमच्या कामातनं देऊ, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी ही तीन तिघाडी, काम बिघाडी आहे. ते एकमेकांच्या तंगड्यात तंगडं घालून कोसळणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आपण न बोललेलं बरं, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी सांगलीच्या जागेवरून सुरू असलेला घडामोडी बद्दल भाष्य केलंय.
देशाच्या जनतेने मोदींना पंतप्रधान करण्याचे ठरवले आहे. दुसरीकडे राहुल गांधी गरम झाले तर थंड व्हायला परदेशात जात असतात. मात्र नरेंद्र मोदी ऊन, वारा, पाऊस कसलीही तमा न बाळगता अहोरात्र देशासाठी काम करत आहेत. त्यामुळे असा पंतप्रधान कोणाला नकोय? देशाची बदनामी करणारा पंतप्रधान हवा आहे, की देशाची उन्नती करणारा, हे देशातील जनतेने ठरवले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी बोलताना व्यक्त केला.
