ठाण्यात आरक्षणाच्या सोडतीआधीच महापौरपदासाठी फिल्डींग सुरू
सिद्धेश शिगवण
ठाणे : ठाणे महापालिकेवर सलग ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकत असून पुढील महापौर कोण होणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज २२ जानेवारी रोजी महापौरपदासाठी जाहीर होणाऱ्या आरक्षणानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे. खुले प्रवर्ग, ओबीसी प्रवर्ग, महिला आरक्षण तसेच अनुसूचित जमाती (एसटी) यापैकी कोणते आरक्षण जाहीर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी त्यात्या गटातील इच्छुकांनी आतापासूनच महापौरपदासीठी फिल्डींग लावायला सुरुवात केलीय.
ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना–भाजप महायुतीने घवघवीत यश मिळवत एकूण १०३ नगरसेवक निवडून आणले आहेत. यामध्ये शिवसेनेचे (शिंदे गट) ७५ तर भाजपचे २८ नगरसेवक आहेत. महापालिकेतील एसटी प्रवर्गातून प्रभाग क्रमांक १ मधून विक्रांत तांडेल आणि प्रभाग क्रमांक ५ मधून सुलेखा चव्हाण हे विजयी झाले आहेत. जर महापौरपद एसटी प्रवर्गासाठी आरक्षित झाले, तर या दोघांपैकी एकाला लॉटरीद्वारे संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही नगरसेवक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ओवळा–माजिवडा प्रभाग समितीतील असून, दोघेही प्रथमच महापालिकेत निवडून आले आहेत. दरम्यान, महापौरपद खुले प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यास शिवसेना शिंदे गटात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. शिवसेनेचे सचिव तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय राम रेपाळे, विकास रेपाळे, ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर, ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे तसेच माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक आदींची नावे प्रमुख दावेदार म्हणून चर्चेत आहेत.
२२ जानेवारीच्या आरक्षण घोषणेनंतर ठाणे महापालिकेतील महापौरपदाची राजकीय दिशा निश्चित होणार असल्याने शहरातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
