मुंबईतील कंपन्यांशी दावोसला जाऊन करार कशाला- राऊत

मुंबई: ज्या कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत, त्यांच्याशी करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरजच काय ? असा सवाल करीत संजय राऊत यांनी जीएसडब्ल्यू (JSW) ज्याचे मुख्यालय मुंबईच्या बीकेसीमध्ये आहे, लोढा ज्यांचे हेडक्वार्टर मुंबईत आहे आणि संगमनेरच्या पंचशील सारख्या कंपन्यांशी दावोसला जाऊन करार केले गेले आहेत, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

  भारतातल्याच कंपन्यांशी दावोसला जाऊन करार करणे आणि त्याचे फोटो सर्वत्र झळकवणे, यामुळे जगामध्ये भारताचे हसे होते असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे असल्याचे राऊत यांनी नमूद केले. राज्यांच्या या मोठ्या शिष्टमंडळांवर पंतप्रधानांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे, कारण हे सर्व जनतेच्या कराच्या पैशावर सुरू आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

संजय राऊत म्हणाले की, सरकारने सांगितलेले आकडे सुखावणारे असले तरी ते फुगवून सांगितले जात आहेत असा त्यांचा आरोप आहे. एका दिवसात १४ लाख कोटींचे करार आणि १४ लाख रोजगार मिळणार असे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात ही गुंतवणूक कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. गेल्या पाच वर्षांतील दावोस दौऱ्यांचे आकडे एकत्र केले तर ते ७५ लाख कोटींवर जातात. इतकी गुंतवणूक खरंच आली असेल तर ती कुठे आहे, हे सरकारने दाखवावे. जे काम मुंबईत बसून होऊ शकते, त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून पैसा खर्च करून ‘पंचतारांकित पिकनिक’ करण्याची गरज काय? असा सवाल त्यांनी केला असून, या दौऱ्यांवर किती खर्च होतोय हे राज्याला कळावे अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *