बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात उद्धव आणि राज ठाकरेंचा एल्गार

मुंबई : हिंदृहृदय सम्राट बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे शिकवलं, आपण जगायचं हे कसं विसरुन गेलो तर दोन व्यापाऱ्याचे गुलाम म्हणून जगणं आपल्या नशिबी येईल. मेलो तरी बेहत्तर दोन व्यापाऱ्यांचा गुलाम म्हणून मी आयुष्यात कधी जगणार नाही ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे. आपण लढत आहोत आणि लढणार आहोत, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त शिवसैनिकांना दिला. कल्याण डोंबिवलीतील महापालिकेत एकनाथ शिंदेंना पाठींबा दिल्यामुळे ठाकरे बंधूत नाराजी असल्याच्या बातमीला मुठमाती देत राज ठाकरेंनीही आज उद्धव ठाकरेंच्या सुरात सुर मिसळत लढत राहण्याचा एल्गार केला.

मराठ्यांचा इतिहास जेवढा रक्तरंजित आहे, तितका रक्तरंजित इतिहास जगाच्या पाठीवर नाही. मात्र, रक्तरंजित इतिहासात पाठीवर गद्दारांनी वार केलेत. मुंबईवरचा शिवरायांचा भगवा उतरवलात, काय मिळवलंत,काय महापौरपद, अरे आपल्याकडे २५ वर्ष सत्ता होती. आपण सर्व गड राखले हे कतृत्त्व तुमचं आहे. मुंबईकरांनी इतर सर्वांनी विचार करावा आपल्याला जपणारा कोण आहे आणि आपला व्यापार करणारा कोण आहे, याचा विचार सर्वांनी करावा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

 आजपासून जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. या सगळ्या काळात अनेक चढ उतार आपण सर्वांनी पाहिले, अनुभवले आहेत. राज आणि माझं बालपण एकत्र गेलं, आम्ही वादळात खेळत मोठी झालेली मुलं आहोत, त्यामुळं वादळाशी कसं लढायचं हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. वादळाशी जसं लढायचं असतं तसं वादळाची जबाबदारी खांद्यावरती पेलणं किती कठीण असतं हे ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे, त्यालाच कळू शकतं असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात, आज सगळे हळहळत आहेत. ही लढाई तुम्ही उत्तम पद्धतीनं लढलात,अशा प्रतिक्रिया देशभरातून येत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना संपली, ठाकरे नाव पुसून टाकणार हे चित्र केलं जात होतं, त्यांना तुम्ही रोखलंत, हे फक्त महाराष्ट्र करु शकतो, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. संपूर्ण महाराष्ट्र यांना वेगळ्या पद्धतीनं पादाक्रांत करायचाय, महाराष्ट्र गिळायचा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना म्हणून आपला जन्म झाला आहे. थोडक्यात निसटता पराभव आपला झाला आहे. इतर ठिकाणी निवडणुका होत आहेत. निवडणुका जिंकण्याचं तंत्र त्यांनी आणलंय. परत नव्यानं सुरुवात करायची आहे. पुन्हा नव्यानं सुरुवात करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेला नवी पालवी फुटलेली आहे. पानगळ होणं गरजेचं असतं. सडलेली झडलीच पाहिजेत, ती सडेपर्यंत नवे कोंब फुटत नाहीत. सडलेल्या पानात जीव नाही, विकली गेलेली पानं झाडाला तरारी देऊ शकणार नाही. आज सुद्धा प्रत्येक वॉर्डात एकापेक्षा एक सरस उमेदवार बसले होते. काही जणांना सर्व काही दिलं तरी ते नाराज झाले. मला सर्व शिवसैनिक सारखे आहेत. जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *