मुंबई : उद्धव ठाकरे शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे शिवसेना यांच्यात संभाव्य युतीच्या चर्चांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. आम्ही कोणासमोरही लाचार होणार नाही,असे ठणकावून सांगत त्यांनी शिंदेसेनेचा पाठिंबा घेण्याची शक्यता फेटाळली.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, महापालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटाची मदत घेतली जाईल का, या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. युतीबाबतचा निर्णय पक्षप्रमुख आणि पक्षाची अधिकृत यंत्रणा घेईल. मात्र आम्ही शिंदे गटाचा पाठिंबा घेणार नाही, हे स्पष्ट आहे. शिवसेनेवर अद्याप इतके वाईट दिवस आलेले नाहीत की केवळ सत्तेसाठी तत्त्वांशी तडजोड करावी, असे ते म्हणाले.
यावेळी राऊत यांनी भाजपवरही टीका केली. आम्हाला सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही. आम्ही सत्तेसाठी हपापलेले नाही. मात्र भाजपची सत्तेची हाव संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. प्रचंड आर्थिक बळाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला गेला, यातून त्यांची लोकशाही विषयक भूमिका स्पष्ट होते, असा आरोपही त्यांनी केला.
