गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर विधानसभा अधिवेशनामध्ये आवाज उठविला जाईल -सचिन अहिर
राजेंद्र साळसकर
मुंबई-एक काळ असा होता,स्वातंत्र्य मिळालेल्या भारतात सुई देखील बनत नव्हती, पण सत्तेवर आलेल्या प्रत्येक नेतृत्वाने आपापल्या परीने योगदा‌न दिले आणि देशाला राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले‌.पण अलीकडे सत्तेवर आलेल्या सरकारने हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न चालविला आहे.इतिहास आमच्याच काळात २०१४ नंतर घडलाय, अशी खोटी हाकाठी पिटण्यास सुरुवात केली आहे.परंतु इतिहासामधील सत्य कदापि पुसता येणार नाही.हे सांगण्यासाठी आता नव्या पिढीने पुढे आले पाहिजे,असे प्रतिपादन राष्ट्रीय मिल मजूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी येथे ध्वजरोहन प्रसंगी बोलताना केलेआहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ‌ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे यार्षीही मजदूर मंझील समोरील प्रांगणात,देशाचा ७७ वा प्रजासत्ताकदिन समारोह आयोजित करण्यात आला होता.अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.याप्रसंगी सरचिटणीस गोविंदराव मोहिते आणि सर्व पदाधिकारी, तसेच कामगार,आंबेकर प्रतिष्ठान कॅटरिंग कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शूर वीरांना अभिवादन करून अध्यक्ष आमदार सचिन अहिर म्हणाले,आज राज्यसरकार परदेशातून गुंतवणूक आणली,असे मोठ्या तोऱ्यात म्हणत असले तरी,राज्यात कारखाने बंद पडत आहेत, बेरोजगारी आणि उपासमारीचा प्रश्न चिंताग्रस्त होऊन बसला आहे,ही गोष्ट सोयीस्करपणे विसरली गेली आहे!गेल्या पाच वर्षापासून मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातील बंद एसटीसी गिरण्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारने डोळेझाक केली आहे. या प्रश्नावर लोकसभेत आवाज उठवण्यासाठी खासदारांना लवकरच निवेदन देण्याचे सत्र सुरू करण्यात येईल,अशी आपल्या भाषणात सचिन आहिर यांनी ग्वाही दिली आहे
गिरणी कामगार घराच्या रखडलेल्या प्रश्नावर सचिन अहिर म्हणाले, कामगारांना जाचक ठरणारे १७ वे कलम राज्यसरकारने रद्द केले, हे १४ कामगार संघटना एकत्र येऊन  उभारण्यात आलेल्या लढ्याचे यश आहे! परंतु सरकारने जे सकारात्मक आश्वासन दिले आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी,यासाठी लवकरच होणाऱ्या विधानसभा अधिवेशनामध्ये निश्चितपणे आवाज उठविला जाईल. ध्वजारोहण सोहळा सेवा दलाचे प्रमुख लालचंद पांडे यांच्या संयोजनाखाली पार पडला. उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांचे याकामी महत्व पूर्ण सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *