मतदानाअगोदरच बिनविरोध निवडीचा महायुतीचा राणे पॅटर्न…!
जिल्हा परिषद आणि ६ पंचायत समिती उमेदवार बिनविरोध
ऊबाठा सेनेला धक्का!
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे मतदान होण्यापूर्वीच महायुतीला मोठे यश मिळाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्याची मुदत असली तरी त्यापूर्वीच ५ जिल्हा परिषद गण आणि ६ पंचायत समिती गटातील महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सर्वात आश्चर्याची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व मतदार संघात उभाटाच आपले अर्ज उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या घटनेमुळे पक्षाच्या अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या उभा ठाक सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. अलीकडे झालेल्या जिल्ह्यातील चार नगरपरिषदांच्या निवडणुका भाजप आणि दोन्ही शिवसेना पक्षाने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकत अतिशय चुरशीने लढवल्या होत्या. याही निवडणुकीत हेच चित्र पुन्हा पाहायला मिळेल असे वाटत असताना भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेत महायुतीतील तिन्ही घटक पक्षांना एकत्र आणत जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ तयार केला आणि तो तिन्ही पक्षांच्या गळी उतरवला.
हा ‘फॉर्म्युला ‘जाहीर होताच त्यावरून महायुतीच्या तिन्ही घटक पक्षात वाद आणि कुरबुरी सुरू झाली आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंडखोरीही झाली. बंडखोरी थोपवण्याचे काम सुरू असून तिन्ही घटक पक्षांचे नेते दररोज बैठका घेऊन ही बंडखोरी थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याला उद्यापर्यंत निश्चित यश येईल अशी खात्री नेतेमंडळींना वाटत आहे. एका बाजूला हे काम सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे आव्हान मोडीत काढण्याच्या दृष्टीने महायुतीतील नेते कामाला लागले असून जिल्ह्यात ठिकठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना फोडून आपल्या पक्षात घेण्याचे सत्र महायुतीतील भाजपा आणि शिंदे सेनेने सुरू ठेवले आहे. प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याचे आणि निवडणूक एकतर्फी कशी होईल त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान महायुतीतील बंडखोरी हे शिंदे सेनेपेक्षा भाजपा समोर मोठे आव्हान आहे.जिल्ह्यात राणे म्हणतील ठरवतील ते घडतं ही परंपरा असतांना बंडखोरीनं अचानकपणे डोकं कसं वर काढलं? त्यातही कुडाळ – मालवण तसंच जिल्ह्यात काही ठराविक भागातच बंडखोरी कशी उफाळून आली? त्यांचा बोलविता धनी भाजपामध्ये कोणी आहे का? याचा शोध राणेंच्या गोटात सुरू आहे.खासदार राणे,पालकमंत्री नितेश राणे आणि शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे हे तर जिल्ह्यात तळ ठोकून आहेत गेले काही दिवस पक्षांतर्गत बंड थोपवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत.उद्या या बंडखोरांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही तर ही बंडखोरी कशी मोडून काढायची याचाही ‘फॉर्म्युला ‘ तयार असल्याचे बोलले जात आहे.
हे ठरले बिनविरोध
जि. प. गट: प्रमोद कामत (बांदा-भाजपा), प्राची इस्वलकर(खारेपाटण-भाजपा), रुहीता तांबे (जानवली,शिंदेसेना), सुयोगी घाडी (पडेल-भाजपा), अवनी तेली (बापर्डे-भाजपा)
पंचायत समिती गण:
संजय राणे (बिडवाडी), सोनू उर्फ राजेश सावंत (वरवडे), अंकुश ठुकरूल (पडेल),गणेश राणे (ना डण), संजय लाड (बापर्डे), साधना नकाशे (कोकिसरे)–सर्व भाजपा.
