राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी – राजन राजे
ठाणे : ३० जानेवारी, याच दिवशी, अहिंसेच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी या पुजाऱ्याची, एका अधम वृत्तीच्या माथेफिरुकरवी कट रचून निर्घृण हत्या करविली गेली.बरोबर ७८ वर्षांपूर्वी ‘गांधी’ नावाच्या महात्म्याची हत्या झाली खरी; पण, ‘गांधीवाद आणि गांधीविचार’ कधिच मेले नाहीत, कधिच मरणार नव्हते…कारण, आजच्या जागतिक-तापमानवाढीसारख्या महासंकटामुळे भयग्रस्त झालेल्या व भांडवली-नववसाहतवादी दुष्प्रृत्तींमुळे, अशांत-अस्वस्थ झालेल्या जगाला.केवळ, ‘गांधीविचार’च तारु शकतो; हे एव्हाना, या समरप्रसंगी, अवघ्या जगाच्या चांगलंच ध्यानी आलंय, असे मत धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी व्यक्त केले.
आपल्या याच, विश्ववंदनीय महात्म्याचे, हेच वैश्विक-विचार पुढे नेण्यासाठी ‘धर्मराज्य पक्ष’, ठाणे जिल्हा काँग्रेस आणि ‘मूलभूत अधिकार संघर्ष समिती’ या समविचारी पक्ष-संघटनांच्या वतीने, ३० जानेवारी-२०२६ रोजी, सायंकाळी ठीक ५ वा. मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलंय.
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे आणि डाव्या चळवळीतील विद्रोही नेते कॉ. आनंद तेलतुंबडे, हे दोघे मान्यवर प्रभावी वक्ते ‘गांधी-विचारविश्वावर’ प्रकाशझोत टाकताना, आपल्यातील समाजघातकी, राष्ट्रद्रोही व अतिरेकी अशा उजव्याशक्तिंचा यथोचित समाचार घेतील.  सर्वसामान्यांना अज्ञात असलेल्या ‘गांधींची ओळख’, या व्याख्यानातून होईलच; पण, त्याचबरोबर गांधीहत्येचं नेमकं ‘सत्य’ही, या व्याख्यानातून पुढे येईल. आजपर्यंत ढोंगी व जात्यंध्य हिंदुत्ववाद्यांकडून, आपल्या महात्म्याबद्दल आणि त्यांच्या हत्येसंदर्भात अनेक अफवा बेमालुमपणे प्रसारित केल्या गेल्या; त्या सप्रमाण, पुराव्यांसह खोडून काढण्याचं महान कार्य, या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हावं, ही अपेक्षा आहे. आपल्या राष्ट्रपित्याचं कळीकाळाला पुरुन उरणारं महान कार्य व त्याचा संदेश…जनसामान्यांपर्यंत साद्यंत पोहोचावा; तसेच, त्याच्या ‘हौतात्म्या’तून अंशतः का होईना, पण उतराई होता यावे, यासाठीच,”गांधीहत्या आणि आपण…” या व्याख्यानाचं प्रयोजन आहे आणि त्यासाठीच, आपली उपस्थिती आवर्जून प्रार्थनीय आहे, असे आवाहन राजन राजे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *