धागडाचा ऐतिहासिक ‘पूर्व बुरुज’ पर्यटकांसाठी खुला
ट्रेक क्षितिज संस्थेची श्रमदान मोहीम यशस्वी
कल्याण : ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धनाच्या उद्देशाने ‘ट्रेक क्षितिज संस्था, डोंबिवली’च्या शिलेदारांनी सुधागड दुर्गावरील दुर्लक्षित असलेल्या ‘पूर्व बुरुज’ परिसरात श्रमदानाची विशेष मोहीम यशस्वीरीत्या राबवली. २४ व २५ जानेवारी रोजी झालेल्या या मोहिमेमुळे वर्षानुवर्षे झाडीने बुजलेला मार्ग मोकळा झाला असून, आता गडप्रेमी व पर्यटकांना या ऐतिहासिक बुरुजापर्यंत सहज व सुरक्षितपणे पोहोचता येणार आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये केलेल्या पाहणीत पूर्व बुरुजाकडे जाणारी वाट दाट गवत, काटेरी झुडपे आणि दगडधोंड्यांमुळे पूर्णपणे बंद असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी केवळ स्थानिक गाईडच्या मदतीनेच हा मार्ग पार करता येत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी ट्रेक क्षितिजच्या सदस्यांनी २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून श्रमदानास सुरुवात केली. सलग मेहनतीने दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे एक किलोमीटरचा मार्ग स्वच्छ करण्यात आला.
मूळ वाट काही ठिकाणी अत्यंत धोकादायक व उघडी (एक्स्पोज्ड) असल्याने, संस्थेच्या सदस्यांनी श्रमदानातून एक सुरक्षित पर्यायी मार्गही तयार केला. तसेच बुरुजावर उतरणाऱ्या पायऱ्यांवर साचलेले दगड, माती, गवत व काटेरी झुडपे हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. दुपारचे जेवण लांबणीवर टाकून सलग दोन तास कष्टाचे काम करत हा ऐतिहासिक वारसा पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. सुधागडच्या संरक्षण व्यवस्थेत पूर्व बुरुजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भोरप्याची नाळ व घोडजीन वाटेने येणाऱ्या शत्रूला रोखण्यासाठी या बुरुजाची रचना मोक्याची ठरली होती. हा बुरुज जिंकला गेला असता तर शत्रूस थेट महादरवाजापर्यंत पोहोचणे सोपे झाले असते. त्यामुळे या बुरुजाचे संवर्धन ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे.
या संदर्भात मोहीम प्रमुख शुभम सावंत यांनी सांगितले, “मांडवीकोटावरील सलग पाच मोहिमांनंतर आम्ही सुधागडचा पूर्व बुरुज मोकळा करण्याचा संकल्प केला होता. संघातील सर्व सदस्यांच्या चिकाटीमुळे आज हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा सर्वांसमोर आला आहे. दुर्गसंवर्धनाचे हे कार्य भविष्यातही असेच सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे.” या मोहिमेत प्रशांत राबांडे, महेंद्र गोवेकर, राहुल मेश्राम, प्रिया कराडकर, संदेश मुठे, कपिल कुलकर्णी, शैलजा धनगर, प्रणाली नारकर, सुजल राबांडे, अथर्व गावकर, तृप्ती मांजरेकर, प्राची कोकाटे, सागर रासम, प्रशांत साठे, स्नेहल झोपे, सोनाली मांजरेकर व निकिता पवार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *