मुंबईत रंगला ‘कुस्तीचा महादंगल’
प्रजासत्ताक दिनी कुस्तीचा ऐतिहासिक उत्सव
रामदास आठवले, गोपाळ शेट्टी, मुकेश ऋषी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर २६ जानेवारी रोजी विलासराव देशमुख मैदान, लोखंडवाला, कांदिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आलेला “कुस्तीचा महादंगल” हा भव्य व दिमाखदार कार्यक्रम उत्साहात पार पडला. भारतीय कुस्तीच्या गौरवशाली परंपरेला नवे बळ देणारा आणि आधुनिक स्वरूप देणारा हा उपक्रम ठरला.
कुस्तीचा महादंगल २०२६ या स्पर्धेसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. श्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र सरकारचे जलसंपदा मंत्री मा. श्री गिरीश महाजन, कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर, बोरीवलीचे आमदार संजय उपाध्याय, विधान परिषद सदस्य मा. राजहंस सिंह, माजी खासदार गोपाळ शेट्टी, सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी, भोजपुरी गायक संजय यादववंशी, अभिनेत्री दीपानीता पत्रा यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
या महादंगलचे संरक्षक नरसिंह यादव आणि शिल्पी यादव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे प्रमोशन करण्यात येत आहे. नासिर हुसैन आणि सुप्रतिक सेन यांनी या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप दिले. हा महादंगल केवळ एक स्पर्धा नसून भारतीय कुस्तीला नव्या उंचीवर नेणाऱ्या दीर्घकालीन दृष्टीकोनाची सुरुवात असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. येत्या काळात संपूर्ण वर्षभर महादंगल सिरीज अंतर्गत देशातील अव्वल कुस्तीपटू सहभागी होणार आहेत.
या ऐतिहासिक कुस्ती उत्सवात मराठा वॉरियर्स, एमपी महावीरस, यूपी योद्धाज आणि शेर-ए-पंजाब या संघांनी सहभाग घेतला. नरसिंह फाउंडेशन आणि नागरिक संरक्षण दल यांच्या वतीने आयोजित या महादंगलमध्ये महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि पंजाब केसरी करणदीप सिंग यांच्यासह देशातील नामवंत कुस्तीपटूंनी जबरदस्त झुंज दिली.
यावेळी आमदार संजय उपाध्याय म्हणाले,
“कुस्तीचा महादंगल लीग प्रचंड यशस्वी ठरला आहे. २६ जानेवारीसारख्या पवित्र दिवशी कुस्तीची परंपरा पुन्हा सुरू केल्याबद्दल नरसिंह यादव आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो. युवकांचा उत्साह आणि कुस्तीपटूंची मोठी उपस्थिती पाहता, मुंबईत कुस्तीचा सुवर्णकाळ पुन्हा सुरू झाला आहे, हे निश्चित.” अभिनेते मुकेश ऋषी यांनीही कुस्तीच्या वाढत्या लोकप्रियतेचा उल्लेख करत अशा भव्य आयोजनांचे महत्त्व अधोरेखित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *