मुंबईत कुस्तीचा महासंग्राम
नरसिंह यादव दंगल लीगचे अजिंक्य महाराष्ट्राकडे
मुंबई: अर्जुन पुरस्कार विजेते व ऑलिम्पियन  नरसिंह यादव (पोलीस उपायुक्त, मुंबई) यांच्या संकल्पनेतून आणि नरसिंह फाउंडेशन तसेच नागरिक संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नरसिंह यादव दंगल लीग’ स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजयी झेंडा फडकावला. विलासराव देशमुख मैदान, लोखंडवाला, कांदिवली (पूर्व), मुंबई येथे झालेल्या या एकदिवसीय कुस्ती लीगमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांचे संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघातून ५ पुरुष व २ महिला अशा एकूण ७ खेळाडूंनी सहभाग घेतला असून, स्पर्धेत एकूण २८ कुस्तीपटूंनी आपली ताकद आजमावली.
स्पर्धेची सुरुवात हरियाणा व पंजाब यांच्यातील चुरशीच्या सामन्याने झाली. या लढतीत हरियाणाच्या ५ कुस्तीपटूंनी विजय मिळवला, तर पंजाबच्या २ कुस्तीपटूंनी बाजी मारली. परिणामी पहिला सामना हरियाणा संघाने जिंकला. दुसऱ्या सामन्यात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यात रंगतदार सामना झाला. महाराष्ट्राच्या ४ कुस्तीपटूंनी विजय मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली, तर उत्तर प्रदेशच्या ३ कुस्तीपटूंनी विजय मिळवला. या सामन्यात महाराष्ट्र संघ विजयी ठरला. अंतिम सामन्यात महाराष्ट्र आणि हरियाणा आमनेसामने आले. महाराष्ट्रच्या पृथ्वीराज पाटील, रविराज चव्हाण, आदर्श पाटील, अमृता पूजारी आणि सोनाली मंडलिक या पाच कुस्तीपटूंनी शानदार विजय मिळवला, तर हरियाणाच्या अंकुश सागर दहिया आणि कुसुम दहिया यांनी आपापले सामने जिंकले. अंतिम फेरीत महाराष्ट्रने ५–२ असा विजय मिळवत नरसिंह यादव दंगल लीगचे चॅम्पियन पद पटकावले.
या स्पर्धेसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त निकेत कौशिक, आमदार अतुल भातळखर, आमदार संजय उपाध्याय, दुबईतील उद्योगपती काझी अब्दुल मतीन, संपत साळुंखे, माजी खासदार गोपाळ शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी यांनी प्रेक्षकांशी साधलेल्या संवादामुळे मैदानात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी बोलताना आयोजक नरसिंह यादव म्हणाले, “देशातील कुस्तीला नवसंजीवनी देण्यासाठी अशा लीग स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. या माध्यमातून अनेक नवोदित कुस्तीपटू घडतील. मुंबई व परिसरातील प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी मनापासून आभारी आहे.”
स्पर्धेतील विजेत्यांवर लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला. विजेत्या महाराष्ट्र संघाला आयोजक नरसिंह यादव आणि डॉ. शिल्पी शेरॉन-यादव यांच्या हस्ते चांदीची गदा आणि ‘नरसिंह यादव दंगल लीग’ ची मानाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. ही स्पर्धा कुस्तीप्रेमींसाठी अत्यंत रोमांचक ठरली. सर्व संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि संघबळाच्या जोरावर महाराष्ट्राने चॅम्पियनपदावर आपले नाव कोरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *