बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा माणूस अजित पवार त्यांच्या बारामतीच्या मातीत विसावले. गुरूवारी दुपारी १२ वाजून ८ मिनिटांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ आणि जय पवार यां दोघांनी अजित पवारांच्या पार्थिवाला अग्नी दिला. अवघा महाराष्ट्र अजितदादांच्या निधनाने शोकसागरात बुडाला. दादांना अलविदा करण्यासाठी आज देशभरातुन नेतेमंडळी आणि दादांच्या चाहत्यांनी लाखोंच्या संख्येन गर्दी केली होती. चितेच्या प्रत्येक ज्वाळेसोबत लाखोंचा हुंदका अश्रुंना वाट मोकळी करून देत होता.

मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी येतअसताना बुधवारी दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाले.

गुरूवारी सकाळी अजित पवार यांचे पार्थिव सकाळी आठच्या सुमारास काटेवाडी येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घरातून अंतयात्रेला सुरूवात करण्यात आली. बारामती येथील पेन्सिल चौकातून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात पार्थीव आणण्यात आले. त्यावेळी ‘अजित दादा अमर रहे’ च्या घोषणांनी अवघा परिसर दुमदुमून गेला होता.  ‘दादा परत या परत या’ अशा घोषणा देखील उपस्थित जनसमुदायाकडून वारंवार देण्यात येत होत्या.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अजितदादा यांच्या पार्थिवाला प्रथम पुष्पचक्र अर्पण करून अखेरची श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ,रक्षा खडसे,माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश, माजी खासदार निवेदिता माने, मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, राणा जगजितसिंग, उद्योजक नरेश आरोरा, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आदिती तटकरे,अभिनेता रितेश देशमुख, खासदार बजरंग सोनावणे,निलेश लंखे, संजय दिना पाटील, धनंजय मुंडे, नमिता मुंदडा,माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे,जयदिप कवाडे,अमोल मिटकरी,झिशान सिद्दीकी,सुरज चव्हाण यांच्यासह देशभरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आमदार खासदार या प्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *