दिवाकर शेजवळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या करुण अंताने सारा महाराष्ट्र हळहळत आहे. एक दमदार नेतृत्व अकाली काळाच्या पडद्याआड गेले आहे. दादांचा राजकारणातील उदय, त्यांना मिळालेली संधी आणि वाव हा त्यांचे काका शरद पवार यांच्या वरदहस्ताने जरूर होता. पण विशाल वृक्षाच्या छायेखाली छोटी रोपटी वाढण्याऐवजी खुरटण्याचाच धोका अधिक असतो. अजितदादा त्याला अपवाद ठरले, हे मान्यच करावे लागेल. त्यांनी स्वत:च्या गुणवत्तेवर आपले नेतृत्व परिश्रमपूर्वक विकसित करत राज्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते.

अजितदादा यांच्या आठवणी जागवतांना सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी हे त्यांच्या गुण वैशिष्ट्यांची वाखाणणी करत आहेत. साडेतीन दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी सत्ताकारण आणि समाजकारणावर आपल्या नेतृत्वाची पाडलेली छाप अमीट आहे.

लोकांसाठी अहोरात्र उपलब्धता, वक्तशीरपणा, कामकाजात शिस्तबद्धता,

प्रशासनावर पकड, प्रश्नांचा खोलात जावून अभ्यास करण्याची वृत्ती, सत्तेच्या पदाला न्याय देताना कार्यात दर्जा आणि गुणवत्तेबाबत आग्रही भूमिका, राज धर्माच्या पालनाशी बांधिलकी ही अजितदादा यांची लक्षणीय वैशिष्ट्ये होती.

राजकारणात मारक ठरणारा सरळमार्गी स्वभाव आणि स्पष्टोक्तेपणा हा त्यांचा स्थायीभाव होता. सार्वजनिक जीवनात त्यांचा तो ‘ फटकळपणा ‘ गणला गेला. आपल्याला कळलेले वास्तव कठोरपणे बोलून जाण्याच्या रोखठोक वागण्यामुळे त्यांनी वाद आणि वादळे ओढवून घेतली होती. अन् पश्चात्ताप व्यक्त करत नंतर प्रायचित्त सुद्धा त्यांनी घेतली होती.

‘ राज्यकर्त्यांनी ‘ नाही ‘ म्हणायला शिकले पाहिजे आणि नोकरशहांनी ‘ हो ‘ म्हणायला शिकले पाहिजे ‘ असे यशवंतराव चव्हाण हे नेहमी सांगत असत. त्यांचा तो सल्ला आचरणात आणलेले आणि प्रसंगी रोष ओढवून घेत आलेले अजितदादा हे अपवादात्मक नेते होतेहे आवर्जून नमूद केले पाहिजे. सदा सर्वकाळ सर्वांना खुश करणे जसे कुणालाही शक्य नसतेतसेच  उल्लू बनवणे सुद्धा शक्य नसते. हे सत्य  त्यांनी स्वीकारले होते.  सवंग लोकप्रियता आणि कुणाची नाराजी ओढवू नये म्हणून अशक्य कोटीतील कामांचीही आश्वासने देणे हा राजकारणी लोकांमध्ये भिनलेला अवगुण आहे. अजितदादा हे त्यापासून कसोशीने अलिप्त राहिले होते. त्यांचे हे ‘ वेगळेपण ‘ होते. या वेगळेपणामुळेही ‘ दादा ‘ अधिक आणि कायम स्मरणात राहतीलयात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *