अखेर नितीन गडकरींना उमेदवारी जाहीर झाली…
अखेर भारतीय जनता पक्षाने आपली महाराष्ट्रातील पहिली लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. या यादीत महाराष्ट्रातील वीस उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन जयराम गडकरी यांना अपेक्षेनुसार नागपुरातून लोकसभा उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे काही भाजप विरोधकांना पोटशुळ उठला आहे तर काहींनी समाधानाचा श्वास सोडला आहे.
असे म्हणण्याचे कारण असे आहे की भाजपची जी पहिली यादी जाहीर झाली त्यात केंद्रीय मंत्रिमंडळातील ३४ मंत्र्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही नावे होती. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्या पाच मध्ये ज्यांचे नाव घेतले जाते अशा नितीन जयराम गडकरी यांचे नाव नव्हते. त्यामुळे सहाजिकच राजकीय विश्लेषकांसह राजकीय नेत्यांच्याही भुवया उंचावल्या होत्या.
वस्तुतः पहिली यादी जाहीर झाली तेव्हा त्यात महाराष्ट्रातील एकही उमेदवार नव्हता. त्यामुळे साहजिकच गडकरींचेही नाव घेतले गेले नाही असा निष्कर्ष काही पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांनी काढला होता. मात्र काही अपवाद वगळता सरसकट नितीन गडकरींना मोदी आणि शहा या जोडगळीने डच्चू दिला अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यात पत्रकार आणि राजकीय विश्लेषक तसेच राजकीय विश्लेषक देखील मागे नव्हते.
डच्चू दिला असे म्हणण्याचे कारण असे की जेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांचे पटत नाही आणि गडकरी हे पंतप्रधान पदाचे संभाव्य दावेदार असल्यामुळे मोदी त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न मोदी आणि शहा करतात अशा कपोलकल्पित कथा राजकीय वर्तुळात पसरवल्या जात होत्या. त्यात खरोखरी काही तथ्य होते का याबाबत कोणीही खात्रीने सांगू शकणार नव्हते .तरीही अशा कथा अगदी चवीने पसरवल्या जात होत्या.
भरीस भर म्हणजे काही महिन्यांपूर्वी गडकरींनी विधान केले होते की मी आता येत्या निवडणुकीत मला पक्षाने संधी दिली तर मी स्वतःचा प्रचार करणार नाही. मी कुठेही होर्डिंग लावणार नाही आणि निवडणूक रॅली ही काढणार नाही. मी इतकी वर्षे जे काही काम केले आहे ते बघून जनतेचा विश्वास असेल तर जनताच माझा प्रचार करेल आणि जनताच मला मध्ये देऊन निवडून देईल. मी कोणालाही लोणी लावायला जाणार नाही असेही त्यांनी ठणकावले होते. त्यामुळे गडकरी जास्तच वादग्रस्त ठरू बघत होते. त्यातच त्यांना उमेदवारी नाकारली गेली, त्यातच पहिल्या यादीत त्यांचे नाव आले नाही, असे बघून सर्वांनीच ओरड सुरू केली होती. मोदींनी त्यांचा पत्ता कापला, आता गडकरी राजकारणातून संपले, असेही टोकाचे निष्कर्ष काढले जाऊ लागले होते .
भरीस भर म्हणजे महाराष्ट्रातील नरेंद्र मोदी विरोधक एकदमच सक्रिय होत गडकरींची तळी उचलायला धावले होते. त्यातील एकाला हा सर्व प्रकार म्हणजे महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा घोर अपमान जाणवला होता. गडकरींसारख्या कार्यक्षम आणि धडाडीच्या मंत्र्याला उमेदवारी नाकारून मोदींनी महाराष्ट्राचा उपमर्द केला आहे असा आरोपही माध्यमांच्या कॅमेरासमोर केला गेला होता. एका मोदीविरोधकाने चक्क गडकरींना ऑफर दिली होती. गडकरींनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी महायुतीकडून निवडणूक न लढता महाआघाडीकडे यावे, महाआघाडी त्यांना नागपुरातून विजयी करेल असा विश्वासही जाहीररीत्या देण्यात आला होता.
गडकरी नागपुरातून लढणार हे नक्की होते. त्याचबरोबर गडकरींच्या विरोधात नागपुरातून काँग्रेसचाच कोणीतरी उमेदवार लढणार हेही तितकेच निश्चित होते. जेव्हा उत्साही मोदी विरोधकांनी गडकरींना महाआघाडीत या अशी ऑफर दिली तेव्हा महाआघाडीतलाच महाराष्ट्रात सर्वात मोठा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले होते. आमच्याच मित्रपक्षातील नेते गडकरींवर अशा प्रकारे स्तुती सुमनांचा वर्षाव करतात. उद्या गडकरी भाजपचे उमेदवार म्हणून उभे राहिले आणि आमच्यापैकी कोणी गडकरींच्या विरोधात उभे राहिले तर गडकरींचे समर्थक या मोदी विरोधकांचे व्हिडिओ दाखवून आमच्या विरोधात प्रचार करतील आणि आमची गोची करतील. या मंडळींनी असे काही बोलण्यापेक्षा नागपुरातून गडकरींना पराभूत करू शकेल असा चांगला उमेदवार द्यावा असे आवाहनही काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विकास ठाकरे आणि अभिजीत वंजारी यांनी केले होते.
विशेष म्हणजे हा सर्व वाद सुरू असताना गेल्या आठ-दहा दिवसात नितीन गडकरी हे या संदर्भात एक शब्दही बोलले नव्हते. अत्यंत शांतपणे त्यांनी आपले नित्यकर्म चालू ठेवले होते. नाही म्हणायला भारतीय जनता पक्षाच्या इतर नेत्यांनी या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र गडकरी कुठेही बोलले नव्हते.
गडकरी बोलणार नाहीत आणि न बोलताच ते काय करायचं ते करतील हे गडकरींच्या लाखो च्याहत्यांना माहीत होते. त्यामुळे एकूण सर्व गडकरी समर्थक शांत होते. गडकरींना उमेदवारी मिळणार याबाबत सर्वच आश्वस्त होते. त्यानुसार त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे.
गडकरींना महाआघाडीत येण्याची ऑफर काही मोदी विरोधकांकडून देण्यात आली. गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले नेते आहेत तत्त्वनिष्ठा हा त्यांचा विशेष गुण आहे. त्यामुळे महाआघाडीत जायचे म्हणजे पक्ष सोडायचा,पक्ष सोडायचा म्हणजे तत्व सोडायचे, हे गडकरी कधीच करणार नाही हे त्यांच्या समर्थकांना माहीत होते. काही वर्षांपूर्वी गडकरींना अशा प्रकारे काही ऑफर्स देण्यात आल्या होत्या. त्यावेळी आपण प्रसंगी आत्महत्या करू पण पक्ष सोडणार नाही असे गडकरींनी ठणकावले होते. ज्यांनी गडकरींना महाआघाडीत या अशी ऑफर दिली होती त्यांचेही गडकरींचे जुने संबंध आहेत. त्यामुळे गडकरींच्या स्वभावाची त्यांना पूर्ण कल्पना असणारच. तरीही त्यांनी अशी गडकरींना ऑफर कशी दिली याची कारणे ते स्वतःच सांगू शकते शकतील.
असो… तर गडकरींना उमेदवारी जाहीर झाली आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला गेला आहे. एका कार्यक्षम नेत्याला न्याय मिळाला आहे. त्याचबरोबर भाजपने इतरही नेत्यांना न्याय दिला आहे. भारती पवार, कपिल पाटील रामदास तडस, रक्षा खडसे , हिना गावित असे काही जुने चेहरे तर पियुष गोयल पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार असे काही नवीन चेहरेही भाजपने मैदानात उतरवले आहेत. हळूहळू जशी निवडणूक जवळ येईल, तसे चित्र अजून स्पष्ट होणार आहे. आणि निवडणुकीत रंग भरणार आहे. तोवर असे वेगवेगळे अशा वेगवेगळ्या कॉमेंट्स आणि ऑफर्स मतदारांचे मनोरंजन करणार आहेत हे नक्की.