मुंबई ओपन इंटरक्लब टेनिस चॅम्पियनशिप २०२६
शिवाजी पार्क जिमखाना विजेता
मुंबई : शिवाजी पार्क जिमखाना टेनिस कोर्ट्स येथे आयोजित “मुंबई ओपन इंटरक्लब टेनिस चॅम्पियनशिप २०२६” स्पर्धेत शिवाजी पार्क जिमखानाने अंतिम सामन्यात विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले.
या प्रतिष्ठित स्पर्धेत बॉम्बे जिमखाना, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय), खार जिमखाना, शिवाजी पार्क जिमखाना, मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए), वुडहाऊस यांच्यासह मुंबईतील सुमारे २० नामांकित क्लब्सनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात शिवाजी पार्क जिमखाना आणि खार जिमखाना यांच्यात लढत झाली. या सामन्यात शिवाजी पार्क जिमखानाने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक दिली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात एमसीए आणि सीसीआय आमनेसामने आले, ज्यामध्ये एमसीएने बाजी मारत अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामना शिवाजी पार्क जिमखाना आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) यांच्यात खेळवण्यात आला. उत्कंठावर्धक ठरलेल्या या सामन्यात शिवाजी पार्क जिमखानाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
या स्पर्धेचे आयोजन शिवाजी पार्क जिमखानाचे टेनिस सचिव योगेश परुळेकर आणि जनरल सेक्रेटरी संजिव खानोलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. त्यांनी सांगितले की ही स्पर्धा शिवाजी पार्क जिमखानाच्या वतीने, महाराष्ट्र जिल्हा टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.
GOLD LEAF आणि SPORTS SUTRA (मॅनेजमेंट पार्टनर्स) यांच्या यशस्वी व्यवस्थापनाखाली ही स्पर्धा ३१ जानेवारी २०२६ रोजी पार पडली. अंतिम सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले.
