मुंबई पोर्टच्या जागेवर गोदी कामगारांना घरे मिळालीच पाहिजे- ॲड. एस. के. शेट्ये
अनिल ठाणेकर
मुंबई : मुंबई पोर्टच्या जागेवर अनधिकृतपणे  राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी घरे देण्याचा विचार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतात, परंतु ज्या बंदर व गोदी कामगारांनी मुंबई पोर्टच्या विकासासाठी परिश्रम करून बंदराचा नावलौकिक केला, त्या गोदी कामगारांना मुंबई पोर्टच्या जागेवर घरे मिळालीच पाहिजे, असे स्पष्ट उद्गार ज्येष्ठ कामगार नेते  ॲड. एस.के.शेट्ये  यांनी काढले, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली.
मुंबई पोर्ट प्राधिकरण आउटडोअर डॉक्स स्टॉफ श्री सत्यनारायण महापूजा समितीच्या वतीने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी  दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात गोदी विभागातील  कामगार कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. करमणुकीचा कार्यक्रम म्हणून ‘कुटुंब किर्रतन’  हे नाटक दाखविण्यात आले. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस श्री.सुधाकर अपराज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गोदी कामगारांनी कमी कामगार संख्येत काम करून मुंबई बंदराची प्रगती केली आहे. मात्र अद्यापही बोनसचा समझोता करार होऊन देखील अंतिम करारावर सह्या झाल्या नाहीत. स्टॅगनेट झालेल्या कामगारांचा प्रश्नही प्रलंबित आहे. तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना बढती मिळून जे अधिकारी झाले, त्यांना पगारवाढीत न्याय मिळावा. या व इतर उद्योगधंद्यातील कामगारांच्या मागण्यांसाठी भारतातील केंद्रीय कामगार संघटना १२ फेब्रुवारीला भारत बंद करणार आहेत, त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे असे आवाहन केले.  या कौटुंबिक  सोहळ्यात नवी मुंबई सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी मारुती  विश्वासराव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा  ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुंबई पोर्ट  प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर,  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी व माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बापू घाडीगावकर,  पूजा समितीचे अध्यक्ष संदीप घागरे, मुंबई पोर्ट  ट्रस्ट एस.एसटी. आणि ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे सरचिटणीस अंकुश कांबळे आदी मान्यवर व्यासपीठावर  उपस्थित होते. कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे सुंदर निवेदन पूजा समितीचे सल्लागार विजय सोमा सावंत यांनी केले. कौटुंबिक स्नेहसंमेलनासाठी आलेल्या गोदी कामगारांच्या कुटुंबीयांनी नाट्यगृह तुडुंब भरले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *