‘कथांचा महासागर’ या संकल्पनेतून साजरा होणार यंदाचा गोवा पुस्तक महोत्सव
पणजी : पणजीमध्ये ४ ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान गोवा पुस्तक महोत्सव होणार आहे. भाऊसाहेब दयानंद बांदोडकर मैदानावर हा महोत्सव होणार आहे. नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया (शिक्षण मंत्रालय) द्वारे गोवा राज्य, समर्थ युवा फाउंडेशन आणि लोकमान्य सांस्कृतिक फाउंडेशन यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे. पुस्तके, नवीन कल्पना आणि संस्कृतीचा पाच दिवसांचा हा उत्सव असणार आहे.
या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन ४ फेब्रुवारी रोजी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते, गोवा राज्यचे कला आणि संस्कृती, क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री डॉ. रमेश तवडकर, गोवा राज्यचे शिक्षण विभागाचे सचिव प्रसाद लोलयेनकर (आयएएस), नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद सुधाकर मराठे, लोकमान्य कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आणि नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाचे संचालक युवराज मलिक यांच्या उपस्थितीत होणार आहे.
देशभरात वाचनसंस्कृती वाढवण्याच्या एनबीटीच्या उद्दिष्टानुसार गोवा बुक फेस्टिव्हलला राष्ट्रीय स्तरावर विकसित करण्याचा विचार केला जात आहे, असे मलिक यांनी यावेळी सांगितले. इतर राज्यांतील मोठ्या पुस्तक मेळ्यांप्रमाणे हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचा मानस आहे, असं
ते म्हणाले. या महोत्सवातील सर्व कार्यक्रम मोफत असून सर्वांसाठी खुले आहेत. समाजाला पुन्हा एकदा पुस्तकांच्या महत्त्वाशी जोडणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
“गोवा बुक फेस्टिव्हलमध्ये साहित्यिक चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मुलांसाठी खास कार्यशाळा आयोजित केल्या जातात. हा महोत्सव गोव्याच्या जनतेचा आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे तो गोव्याची सर्जनशीलता, संस्कृती आणि समृद्ध परंपरा साजरी करतो. येत्या एक ते दोन वर्षांत गोवा बुक फेस्टिव्हलमुळे गोवा हे भारतातील एक महत्त्वाचे साहित्य पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाईल,” असे त्यांनी सांगितले.
‘अॅन ओशन ऑफ स्टोरीज’ या संकल्पनेवर आधारित गोवा पुस्तक महोत्सव २०२६ देशभरातील वाचक, लेखक, प्रकाशक आणि विचारवंतांना एकत्र आणतो आणि सर्व वयोगटांतील प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव देतो. या महोत्सवात १०० हून अधिक प्रकाशकांचे २०० पुस्तकांचे स्टॉल्स असतील. त्यात इंग्रजी, कोंकणी, मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील विविध पुस्तकं असतील. पुस्तकांवर १०% सवलत देखील मिळेल. हा महोत्सव दररोज सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत खुला राहील.
गोव्यातील बाल साहित्य चित्र प्रदर्शन, सरदार पटेल @१५० आणि वंदे मातरम @१५० यांची प्रदर्शने
गोवा पुस्तक महोत्सव २०२६ मध्ये “गोवा: प्रकाश आणि आनंदाच्या कथा” नावाचे एक विशेष प्रदर्शन देखील आयोजित केले जाईल. या प्रदर्शनात गोव्याच्या नामवंत कलाकारांच्या प्रातिनिधिक कलाकृती सादर केल्या जातील, ज्यांनी नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाने प्रकाशित केलेल्या मुलांसाठीच्या अनेक अभिजात पुस्तकांच्या निर्मितीमध्ये योगदान दिले आहे. हे प्रदर्शन एनबीटीच्या ‘स्टोरीज ऑफ लाईट अँड डिलाईट’ आणि ‘गोवा’ या शीर्षकांच्या अनुक्रमे मारिओ मिरांडा आणि शशी शेट्ये यांच्या कलाकृती सादर करते. गोव्याची दृश्ये, परंपरा आणि स्थानिक आकर्षण टिपणाऱ्या, आठवणींनी समृद्ध अशा शेट्ये यांच्या कलाकृती आणि गोव्याच्या जीवनाचं दर्शन घडवणाऱ्या, विनोदी, शैलीदार आणि सामाजिक पैलू असलेल्या मिरांडा यांच्या चित्रांच्या माध्यमातून, हे प्रदर्शन गोव्याची संस्कृती, सर्जनशीलता आणि कथाकथनाच्या वारशाचं चित्र उभं करेल.
हा महोत्सव प्रत्येक वयोगटातील वाचकांना नेहमीच आकर्षित करतो. कठपुतळी आणि संगीतमय कथाकथन सत्रांसह कथाकथन, माती कला कार्यशाळा, कार्टून बनवण्याच्या कार्यशाळा, पोस्टर आणि बुकमार्क बनवणे, घोषवाक्य लेखन, कथा रंगभूमी, रेखाचित्र कार्यशाळा, प्रश्नमंजुषा, लोकनृत्य सादरीकरण आणि राउंड द रिडल सारखे परस्परसंवादी सत्रे समाविष्ट आहेत. या महोत्सवाची रचना कल्पनाशक्तीला चालना देणारी आणि वाचनाची आवड जोपासणारी आहे.
एका विशेष ‘लेखक मंचावर’ साहित्यिक सत्रांची आकर्षक मालिका आयोजित केली जाईल. संपूर्ण भारतातील प्रसिद्ध लेखक, पत्रकार, विचारवंत आणि सर्जनशील व्यक्ती भाषणे, संवाद आणि चर्चांच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधतील.
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उदय माहूरकर; प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री अविका गौर, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, भारतीय हवाई दलाचे चाचणी वैमानिक आणि अंतराळवीर, लेखक आणि राजकीय विश्लेषक शांतनू गुप्ता, चित्रपट निर्माते आणि विद्वान चंद्रप्रकाश द्विवेदी, इतिहासकार आणि सांस्कृतिक कार्यकर्ते मोहन शेटे,विदुषी आणि लेखिका मेधा खासगीवाले, पत्रकार, संपादक आणि माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर, कायदेतज्ञ आणि लेखक सुमंत बत्रा, अभिनेता अमोल पाराशर, ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते सचिन पिळगावकर, प्रसिद्ध मराठी लेखक, तत्त्वज्ञ आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सदानंद श्रीधर मोरे तसंच लेखक, कवी व तत्त्वज्ञ आचार्य प्रशांत यांचा समावेश आहे.
