भयानक : उमेदवारी ठिकवण्यासाठी
उमेदवाराकडून पोटच्या मुलीची हत्या
नांदेड : निवडणूक लढवण्यासाठी दोन अपत्यांचा नियम असल्यामुळे उमेदवारी रद्द होऊ नये म्हणून एक उमेदवाराने निर्दयीपणे आपल्या पोटच्या एका मुलीचा खून केल्याची खळबळजनक घटना नांदेडमध्ये घडली आहे.
पांडुरंग कोडामंगले (वय २८) या तरुणाने आपल्या जुळ्या मुलींपैकी मोठ्या मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. येत्या जून महिन्यात पंचायत समितीची निवडणूक होणार असून महाराष्ट्र पंचायत राज नियमानुसार दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्या व्यक्तीस उमेदवारी मिळत नाही. पांडुरंगला निवडणूक लढवायची इच्छा होती, मात्र त्याला तीन अपत्ये – एक तीन वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांच्या दोन जुळ्या मुली असल्याने तो या निकषात बसत नव्हता.
याच कारणातून पांडुरंगने आपल्या गावचे सरपंच गणेश शिंदे यांच्याशी चर्चा केली. दोघेही चांगले मित्र असल्याचे समोर आले असून, गणेश शिंदे यांनी त्याला जुळ्या मुलींपैकी मोठ्या मुलीची हत्या करण्याचा सल्ला दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर पांडुरंगने निर्दयपणे आपल्या मुलीचा जीव घेतला.
घटनेची माहिती मिळताच निजामाबाद पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पांडुरंग कोडामंगले व गणेश शिंदे यांना अटक केली आहे. दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
उमेदवारीच्या हव्यासापोटी झालेल्या या अमानवी कृत्यामुळे समाजमन हादरले असून, अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
