राज्यात मैत्री, नाशिकमध्ये कुस्ती!
उपमहापौरपदासाठी शिंदे गट भाजपला भिडला
हरिभाऊ लाखे
नाशिक –महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना नाशिकच्या महापौर पदासाठी शिवसेना ठाकरे गट आणि उपमहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गट मैदानात उतरल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर झाली आहे. महापौरपदासाठी भाजपकडून हिमगौरी आहेर-आडके आणि ठाकरे गटाकडून सीमा पवार यांनी अर्ज दाखल केले. तर उपमहापौर पदासाठी शिंदे गटाने दंड थोपटत प्रवीण तिदमे, विलास शिंदे आणि राहुल दिवे या तीन जणांनी अर्ज दाखल केले. भाजपकडून मच्छिंद्र सानप रिंगणात आहेत.
नाशिकच्या महापौर, उपमहापौर निवडीसाठी सहा तारखेला सकाळी ११ वाजता विशेष सभा होणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी संपुष्टात आली. महापौरपदासाठी ठाकरे गटाने तर उपमहापौरपदासाठी शिंदे गटाने अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत रंग भरले गेले आहेत. १२२ सदस्यांच्या महापालिकेत ७२ जागा मिळवणाऱ्या भाजपकडे बहुमत आहे. विरोधी शिंदे गट (२६), राष्ट्रवादी अजित पवार गट (चार), ठाकरे गट (१५), काँग्रेस (तीन), मनसे आणि अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे.
महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित आहे. भाजपकडे बहुमतापेक्षा १० नगरसेवक जास्त आहेत. निवडणुकीत भाजप विरोधात शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र होता. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी शिंदे गटाच्या महानगरप्रमुखावर गंभीर आरोप केले होते. स्थानिक पातळीवरील संघर्षामुळे शिंदे गटही भाजपचा बिनविरोध निवडीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या मानसिकेत नसल्याचे चित्र आहे. महापौरपदासाठी भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके आणि ठाकरे गटाच्या सीमा पवार यांनी अर्ज दाखल केले. तर उपमहापौरपदासाठी एकूण चार उमेदवारांचे अर्ज दाखल झाले.
यामध्ये भाजपचे मच्छिंद्र सानप तर, शिंदे गटाचे प्रवीण तिदमे, विलास शिंदे आणि राहुल दिवे यांचा समावेश आहे. ठाकरे गटाने उपमहापौर पदासाठी उमेदवार दिलेला नाही. भाजपकडे बहुमत असल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, विरोधी ठाकरे गट आणि भाजपचा राज्यातील मित्रपक्ष मैदानात उतरला आहे. अर्ज छाननीनंतर माघारीची मुदत आहे. तेव्हा निवडणूक बिनविरोध होईल की नाही याची स्पष्टता होणार आहे. शिंदे गटाने सत्तेत बसायचे की विरोधात, या संदर्भातील निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेणार असल्याचे शिंदे गटाचे उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *