केडीएमसीच्या महापौर पदी हर्षाली चौधरी थाविल तर उपमहापौरपदी राहुल दामले
अखेर ६ वर्षाची प्रतीक्षा संपली
कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची आज निवड झाली असून ६ वर्षापासून असलेली राजकीय राजवट आज संपुष्टात आली आहे. महापौर पदासाठी ऍड. हर्षाली चौधरी – थवील आणि उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांची निवड करण्यात आली आहे. महापौर पदासाठी ऍड. हर्षाली चौधरी थविल आणि उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झालीच होती. मात्र आजच्या महासभेत मुंबई जिल्हाधिकारी आचल गोयल या पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या, त्यांनी औपचारिक घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, सचिव किशोर शेळके उपस्थित होते.
कोरोना काळात नोव्हेंबर २०२० रोजी नगरसेवकांचा कार्यकाल संपल्याने राजकीय राजवट सुरु झाली होती. कोरोना तसेच विविध कारणांमुळे महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. गेल्या महिन्यात निवडणुका संपुष्टात येऊन अखेर ६ वर्षानंतर प्रतीक्षा संपली आहे. आज महापौर, उपमहापौर पदाची निवड झाली आहे. १९८३ नंतरची सर्वात मोठी असणारी प्रशासकीय राजवटही आता संपुष्टात आली आहे. १९८३ मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर लागू झालेली प्रशासकीय राजवट तब्बल १९९५ पर्यंत म्हणजेच तब्बल १२ वर्षे होती. त्यानंतर कोविडमुळे २०२० मध्ये कार्यकाळ संपल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट लागू झाली होती. मात्र आता कल्याण डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड झाल्याने गेल्या ६ वर्षांपासून असलेली ही प्रशासकीय राजवटही संपुष्टात आली आहे. या निवड प्रक्रियेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सभागृहाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरम्यान या महापौर आणि उपमहापौर पद निवडीच्या विशेष सभेमध्येच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमधील टोलवा टोलवी दिसून आली. आपल्या हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध असणारे शिवसेनेचे नगरसेवक सचिन पोटे यांनी शिवसेना उबाठाचे गटनेते यांना जोरदार टोला लगावला. “तुम्ही निवडून आले तेव्हा क्रिकेटची टीम होती, मात्र इकडे सभागृहात येईपर्यंत ती कबड्डीची झाली” या शब्दांत सचिन पोटे यांनी शाब्दिक कोटी केलेली पाहायला मिळाली. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.
