श्री गणराज नृत्य कला निकेतन, ठाणे या संस्थेच्या २५ व्या वर्धापन दिननिमित्त
`नृत्यविविधा’ या विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन
ठाणे -भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेचे जतन व संवर्धन करणाऱ्या श्री गणराज नृत्य कला निकेतन, ठाणे या नामांकित संस्थेचा २५ वा रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने संस्थेतर्फे `नृत्यविविधा’ हा विशेष नृत्य कार्यक्रम शनिवार, ७ फेब्रुवारी, सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे (प.) येथे आयोजित करण्यात आला आहे.
नृत्यालंकार मनाली मुकुंदराज देव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या संस्थेच्या संचालिका मनाली देव या प्रसिद्ध कथ्थक गुरू डॉ.  मंजिरी देव व सुप्रसिद्ध तबला वादक तालमणी पं. मुकुंदराज देव यांच्या शिष्या आहेत. या दोन्ही गुरूंचे मोलाचे मार्गदर्शन पण संस्थेला लाभत आहे. गुरु–शिष्य परंपरेच्या माध्यमातून कथ्थक नृत्यकलेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य संस्था सातत्याने करत आहे. या रौप्य महोत्सवी सोहळ्यास डॉ.  मंजिरी देव, पं. मुकुंदराज देव, प्रख्यात कथ्थक नर्तक पं. नंदकिशोर कपोते, खासदार नरेश म्हस्के, तसेच ज्येष्ठ शास्त्रीय गायिका श्रीमती आशाताई खाडिलकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे.
या महोत्सवात संस्थेच्या १५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असून कथ्थक नृत्याच्या विविध बंदिशी, भावप्रधान व कथानकात्मक सादरीकरणे, रंगतदार मराठी लोकनृत्ये तसेच “शक्तिरूपेण संस्थिता” या दिव्य स्त्रीशक्तीला अर्पण केलेल्या विशेष नृत्यनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. २५ वर्षांचा हा प्रवास म्हणजे केवळ काळाची गणना नसून, शिस्त, साधना आणि परंपरेत रुजलेली संस्कारमूल्ये जपणाऱ्या अनेक पिढ्यांच्या घडणुकीचा उत्सव असल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या सांस्कृतिक महोत्सवाला कला रसिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच माध्यम प्रतिनिधींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *