दिवा स्टेशन ते पडले बीएसयुपी व डोंबिवली मार्गावरील बस फेऱ्या वाढवण्याची मनसेची मागणी
आरती परब
दिवा : दिवा रेल्वे स्टेशन ते पडले बीएसयुपी तसेच दिवा स्टेशन ते डोंबिवली या मार्गांवरील ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बसची संख्या व फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसे दिवा शहराचे सचिव प्रशांत प्रभाकर गावडे यांनी ठाणे महानगर पालिकेच्या वाहतूक व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे.
दिवा रेल्वे स्टेशनजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पडले बीएसयुपी व डोंबिवली या मार्गांवर परिवहन सेवेच्या बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही सध्या या मार्गांवरील बसची संख्या अपुरी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिवा स्टेशन ते पडले बीएसयुपी या मार्गावर केवळ दोन बसेस असून त्यामधून फक्त सहा फेऱ्या होत असल्याने दोन फेऱ्यांमधील अंतर एक ते दीड तासांपर्यंत जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
तसेच दिवा स्टेशन ते डोंबिवली या मार्गावरही फक्त दोन बसेस असल्याने फेऱ्यांमधील अंतर मोठे असून अनेक वेळा ऐनवेळी बस रद्द केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. विशेषतः रविवारी अचानक बस फेऱ्या रद्द केल्या जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत असून याबाबत प्रवाशांना कोणतेही स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने प्रशासनाबाबत नाराजी वाढत असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे.
दिवा शहर व परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून अनेक नागरिक डोंबिवली एमआयडीसी, खिडकाळी आदी भागात जाण्यासाठी या परिवहन सेवेवर अवलंबून आहेत. भविष्यातील प्रवासी संख्या लक्षात घेता संबंधित मार्गांवरील बसची संख्या व फेऱ्या वाढवणे अत्यावश्यक असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय कमी होऊन परिवहन सेवेचे उत्पन्न व विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून दिवा शहरातील वरील मार्गांवरील बस सेवा तातडीने सुधारावी, अशी मागणी मनसे दिवा शहराच्या वतीने प्रशांत प्रभाकर गावडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *