सिंधुदुर्गच्या सर्वांगिण विकासाठी कटीबद्ध – उपमुख्यमंत्री शिंदे

राजन चव्हाण

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, रोजगार निर्मिती, पर्यटन वाढ, शेतकरी-बागायतदारांचे प्रश्न आणि लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न  करू असा ठाम विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

कुडाळ येथे आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख संजू परब, दत्ता सामंत आणि महायुतीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शिंदे पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना, भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम महायुती खासदार नारायण राणे यांनी जाहीर केली आहे. या महायुतीचे २५ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत, ही विजयाची नांदी आहे. जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येणे १०० टक्के निश्चित असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावाही त्यांनी केला. खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद  भक्कमपणे कार्य करील असंही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला..

     ‘स्पीड ब्रेकर’ काढला…!

आपल्या कार्यकाळाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, “मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कामांना स्थगिती देण्याचे राजकारण केले नाही, तर विकासाचा ‘स्पीड ब्रेकर’ काढून प्रकल्पांना गती दिली. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी टीका केली, पण ही योजना आजही सुरू आहे आणि भविष्यातही सुरूच राहील. आता २१०० रुपये देण्याची घोषणा केली असून ती आम्ही योग्य वेळी पूर्ण करू असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

    रोजगार- पर्यटनावर भर..!

जिल्ह्यातील तरुणांच्या स्थलांतराचा मुद्दा अधोरेखित करत शिंदे म्हणाले की, सिंधुदुर्गातील तरुणांना नोकरीसाठी मुंबई-ठाण्याला जावे लागू नये, यासाठी जिल्ह्यात ‘स्किल सेंटर’ उभारण्यात येतील. पर्यटनाला चालना देऊन स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केला जाईल. केंद्रानेही बजेटमध्ये कोकणातील नारळ आणि काजू बागायतदारांचा विचार केला असून, राज्य सरकार यात कोणतीही कमतरता भासू देणार नाही.

        या सभेत  उद्योग मंत्री उदय सामंत,जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांनीही मनोगत व्यक्त करत महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

फोटोओळ

कुडाळ येथे शिवसेनेच्या जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी प्रचाराच्या सभेत कोकणवासीयांना विकासाचे वचन देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. सोबत उद्योग मंत्री उदय सामंत,जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *