पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्द
मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या इतिहासातील सर्वात मोठा ट्रॅफीक जाम एका टँकरच्या उलटल्याने झाला. टँकरमधिल वायु गळतीमुळे तब्बल २४ तासाहून अधिकचा ट्रॅफीक जाम घाटात लागल्यामुळे प्रवासातील बस ड्रायव्हर आणि प्रवाशांनी रस्त्यावरच मुक्काम टोकत चुली पेटवल्या.
या टँकर अपघातामुळे पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. दरम्यान प्रवाशांना होणाऱ्या या त्रासाची दखल घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी यंत्रणांना दिल्या. तसेच या दरम्यान संबधित वाहनांना टोलमाफी देण्याचीही आदेश दिले.
दरम्यान,राज्यातील विविध विभागांमधील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये ३७ ई-शिवनेरी व ६६ इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.
तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवन विभागाची एकूण १६३ वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील ४६, सोलापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २०, सांगली विभागातील १८, कोल्हापूर विभागातील १३, पालघर विभागातील १२, ठाणे विभागातील ११ आणि मुंबई विभागातील ७ वाहनांचा समावेश आहे.
या अपघातामुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरही ट्रॅफीक जाम झाल्याने प्रवाशांना पुणे एक्सप्रेसचा प्रवास टाळण्याच्या सुचना देण्यात आल्या असून पर्यायी ताम्हीनी घाटाचा वापर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
