मी पत्रकारितेला विराम देऊन राजकारणात उतरण्याचा प्रयत्न २/३ वर्षा पासून करीत होतो, त्यासाठी वेगवेगळे राजकीय पक्षातील मित्र, पत्रकारिता क्षेत्रातील मित्र आणि काही सहकारी यांच्या सोबत चर्चा सुरू असायची. मी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या खूप पूर्वी सुमारे सात वर्ष आधी मा एकनाथ शिंदे साहेबांनी पक्षात येण्या विषयी म्हणाले होते. मात्र त्यावेळी माझ्या मनाची तयारी काही नव्हती. पण शिवसेनेच्या सर्वच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांशी चांगले संबंध होते. तसे शरद पवार यांची राष्ट्रवादी सर्वांच्या सोबत सलोख्याचे संबंध होते. पण गेली ३५ वर्ष पत्रकारिता करत असताना राजकारण जवळून पाहिलं आहे त्यामुळे आपल्याला केवळ पत्रकारितेच्या माध्यमातून तीरावर बसून योग्य आणि अयोग्य अशी भूमिका असंख्य वेळा घेतली. मात्र विचार केला लोक इतके राजकारणा बद्दल बरे वाईट बोलतात. त्याचा आपणही प्रत्यक्ष अनुभव घ्यावा.
दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे साहेबांच्या पेक्षा डॉ श्रीकांत शिंदे यांच्याशी चांगली मैत्री जमली होती पण पक्षात प्रवेशाचे धाडस नाही होत होते. माझे मॅक्स महाराष्ट्र मध्ये चांगले चालले होते, सर्व बाजूनी प्रतिसाद मिळत होता. एवढे उंचीवर असणारे आर्थिक दृष्ट्याही चांगली स्थिती होती, हे सर्व सोडून राजकारणात पुन्हा शून्यातून उभे राहण्यासाठी उडी घ्यावी का ? घ्यावी तर कुठल्या पक्षात जावे याचे तळ्यात मळ्यात सुरू होते, त्यात मा शरद पवार साहेब यांची भेट झाली, त्यांच्या सोबत एका मंचावर बसण्याची आणि बोलण्याची संधी मिळाली. “निर्भय बनो” आंदोलनात देखील प्रतिसाद मिळत होता.
पण मी काही मित्रांच्या सोबत चर्चा केल्यावर त्यांनी वेगवेगळे सल्ले दिले. अनेकांनी शरद पवार किंवा उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पर्याय सुचवले. प्रकाश आंबेडकर साहेबांची पुण्यात भेट घेतली.
मात्र मला खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात एक स्पार्क दिसला, मित्रत्वाची भावना आणि राजकारणात पुढे जाण्याची महत्वकांक्षा दिसली.
खासदार श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या पहिल्या निवडणुकी पासून ते आता पर्यंत मी बारकाईने पाहिले होते. अतिशय उच्च शिक्षण आणि मा एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून मिळालेला राजकीय वारसा, क्विक लर्नर असल्यामुळे अवघ्या ३/४ वर्षातच खासदार श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या हातातील एक प्रमुख नेता म्हणून उदयाला आले तसे एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या खांद्यावरील एक एक भार उतरवत तो भार आपल्या मुलाच्या नाही तर पक्षाच्या एका दमदार नेतृत्वाकडे सोपविण्यास सुरुवात केली.
सर्वात मोठी कसोटी तेंव्हा लागली जेव्हा मा एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या काँग्रेस धार्जिणे पणाला विरोध करत पक्षातच विद्रोह केला आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना बोलत एल्गार केला. अतिशय बिकट आणि आव्हानात्मक स्थिती होती. भारताच्या राजकीय इतिहासातील हे अभूतपूर्व आणि प्रचंड जोखमीचे असे बंड होते. यापूर्वी शिवसेनेतून अनेक लोक फुटून निघाले पण एकदम ५० आमदार आणि १२ खासदार घेऊन पक्षात विद्रोह होण्याची ही राजकारणाच्या इतिहासातील वेगळी घटना होती, ज्याची दखल केवळ महाराष्ट्र आणि भारतात नाही तर जगातील ३६ देशांनी ही दखल घेतली.
हा विद्रोह यशस्वी करण्यासाठी पडद्या मागील सूत्र हलवणारी मुख्य नेपथ्यकार व्यक्ती कोण असेल तर ती श्रीकांत शिंदे होते. त्या काळात जवळपास १० दिवस श्रीकांत शिंदे यांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता, कुठे किती कसा प्रवास करावा लागत होता. भेटी आणि सोबत येणाऱ्या आमदारांना विश्वास देण्याचे काम श्रीकांत शिंदे यांनी केले. याकाळात त्यांनी राजकारणातील चाणक्यगिरी नेमकी काय असते, प्रचंड दबाव आणि भविष्या बद्दलची अनिश्चितता अशा स्थिती प्रचंड तणाव असताना देखील श्रीकांत शिंदे यांनी धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरे गेले. जेव्हा मा एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे साहेब यांनी गेल्या १५ वर्षात महाराष्ट्रात जे काम केले, पक्षाच्या आमदारांना, जिल्हा प्रमुख, संपर्क नेते आणि कार्यकर्ते यांना जी मदत केली त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे साहेबांच्या बद्दल प्रेम आणि विश्वास होता त्यामुळे त्यांच्या शब्दावर शिवसेनाप्रमुख बाळा साहेब ठाकरे यांचा पुत्र चुकीच्या मार्गाने जात आहे , ज्यांच्या विरोधात ४० वर्ष निवडणूक लढवली त्यांच्या सोबत कसे जायचे हा प्रत्येक शिवसेना खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न होता. त्यांच्या या असंतोषाला योग्य वाट एकनाथ शिंदे साहेबांनी मिळवून दिली आणि त्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता.
माझी नेत्याच्या पुढे पुढे करण्याची, मस्का लावण्याची, खोटी स्तुती करण्याची सुरुवातीपासून स्वभाव नाही , कदाचित तो पत्रकारितेतून आणि अभ्यासातून आला असेल. पण अवलोकन आणि आकलन करण्याची माझी सवय असल्यामुळे मी बारकाईने सर्व गोष्टी पहात होतो.
साहेबांच्या विद्रोहानंतर महाराष्ट्रात प्रचंड गदारोळ उठला होता. सर्वसामान्य लोक बुद्धी पेक्षा भावनेवर अधिक चालतात. त्यामुळे शिंदे साहेबांच्या सोबत खासदाराना देखील प्रचंड ट्रोल केले गेले, अतिशय खालच्या पातळीवर लोकांनी ट्रोल केले मात्र या परिस्थितीतही श्रीकांत शिंदे आपला संयम ढळू न देता परिस्थिती हाताळत होते. महाराष्ट्रातील सर्व सामान्य शिवसैनिका पासून ते शाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख, संपर्क नेते, आमदार यांच्या सर्वांशी बोलत होते, त्यांना धीर आणि विश्वास देत होते त्यातूनच शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेतील प्रदूषण दूर होत जाऊन विचारांना वाहिलेली शिवसेना आकारास येत होती.
धर्मवीर आनंद दिघे यांच्याकडून मा एकनाथ शिंदे साहेबांनी अहोरात्र लोकसेवेचा वसा घेतला होता तीच इस्टेट त्यांनी श्रीकांत शिंदे यांना दिली त्यामुळे “दिवस असो की रात्र महाराष्ट्र आणि देशासाठी कायम उपलब्ध” हे ब्रीद घेऊन श्रीकांत शिंदे काम करतात. मग ते राजकीय बैठक असो, प्रकल्पाची चर्चा असो, पक्षाच्या बांधणीचा विषय असो की, सांस्कृतिक उपक्रम असो सर्वच बैठकीत अतिशय तयारीने काम करणारा नेता म्हणजे श्रीकांत शिंदे यामुळे कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी त्यांना वेगवेगळ्या उपमा देण्यास सुरुवात केली आहे कुणी इन्फ्रामॅन बोलतो, कुणी व्हिजन मॅन तर कुणी राजकारणातील बाजीगर आणि धुरंधर बोलतो.
पूर्वी भाषणाला टाळणारे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोक संवादाची आपली वेगळी अशी भाषणाची शैली तयार केली आहे .
महाराष्ट्राच्या विकासासोबत ठाणे जिल्ह्याचा विकास हा ध्यास घेऊन खासदार काम करीत असतात त्यामुळेच अंबरनाथ सारखे शहर आकाराला आले, कल्याण ग्रामीण मध्ये विकासाची गंगा गेली त्यामुळे भूमिपुत्रांना मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग मोकळा झाला.
खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदार संघात एक सांस्कृतिक क्रांती घडवून आणली. अंबरनाथ मधील १००० वर्ष जुने शिवमंदिर हे पुरातत्व विभागाच्या माध्यमातून जागतिक वारसा होता मात्र त्या मंदिराला जगाच्या नकाशावर अंबरनाथ शिव फेस्टिवल च्या माध्यमातून आणि तीर्थक्षेत्र विकास योजनेतून पुढे आणले आज देशभरातील पर्यटक शिवमंदिराला भेट देत आहेत. इरशाल वाडी या आदिवासी वाडीवर लँड स्लाइड झाल्यावर जे संकट कोसळले तिथे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून घरे बांधण्यापासून मुलाना शिक्षणासाठी दत्तक घेण्यापर्यंत जबाबदारी घेतली.
मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष ही अभिनव योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवल्याने लाखो रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला.
मैत्री होती, लोक चांगले होते पण माझ्या समोर शिवसेनेत प्रवेश करण्यात सर्वात मोठी अडचण होती विचारधारेची. अनेकदा प्रयत्न करून देखील शिवसेनेत प्रवेश करण्याचे धाडस होत नव्हते. आता पर्यंत शेकडो भाषण, आंदोलने विद्यार्थी असल्यापासून केले होते. मात्र दरम्यान मराठा आंदोलन सुरू होते. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या पोटतिडकीने पाठपुरावा करत होते त्यातून शिवसेना कात टाकते आहे असे दिसले. त्यानंतर श्रीकांत शिंदेंचा कौल बघितला तर तो शाहू फुले आंबेडकरी विचारांचा द्वेष करणारा नव्हता उलट कल्याण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्रासाठी त्यांनी आपली सारी ताकद पणाला लावलेली दिसली. तरीही अनेक पत्रकार मित्रांच्या सोबत बोलणे केले. गेली ७५ वर्षात सशक्त असा आंबेडकरी विचारांचा पक्ष किंवा संघटना उभी राहू शकली नाही, ३५ वर्ष सक्रिय आणि पत्रकारितेतून आंदोलन चालवूनही समाजाचे ऐक्य सिद्ध झाले नाही याची प्रचंड सल मनात होती आणि आहेच. काँग्रेस सतत वापरत आली हा इतिहास ठाऊक होता. त्यामुळे आपल्याला जिथे नेत्यासोबत थेट संवाद करता येईल योग्य आणि अयोग्य सांगता येईल, मुक्तपणे काम करता येईल असा विश्वास खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिला. त्यामुळे निर्णय घट्ट झाला
मात्र ही बातमी समाजात गेल्यावर प्रचंड ट्रोल होणार, खोकेबाज वैगरे दूषण लागणार याची कल्पना होती, शिवाय आपल्यावर जळणारी लपून आणि उघड अशी अनेक ओली सुकी लाकडं यानिमित्ताने जळणार, काही दिखाऊ मैत्रीच्या आडून बदनामी करणार हे सर्व गृहीत धरले होते. माझ्या एका पत्रकार मित्राने त्यावेळी मोठा धीर दिला आणि त्याकडे लक्ष देऊ नको सांगितले.
आता मी अतिशय मुक्तपणे शिवसेनेत काम करतो आहे त्याला सर्वाधिक समर्थन आणि पाठिंबा खासदार श्रीकांत शिंदे यांचा आहे. त्यांना मला सुचलेल्या अनेक संकल्पना मांडत असतो. असेच एक अभियान म्हणजे “शाखा तिथे संविधान” हे अभियान. त्यांच्या समोर भूमिका मांडताच त्याला त्यांनी होकार दिला. शिवसेनेच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण होता शिवसेनेच्या मुख्य कार्यालयात संविधानाची प्रास्ताविका लागून तिचे वाचन होणे, त्यानिमित्ताने संविधानाच्या मूल्यांचा प्रचार प्रसार करण्याचे काम सुरू झाले. हे अभियान निवडणुकीच्या काळात सुरू झाले त्यामुळे महाराष्ट्र भर त्याचा दौरा करता आला नाही मात्र आता निवडणुका संपल्या आहेत मी तुमच्या सोबत दौरा करीन असा शब्द खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे.
मला शिवसेनेत अजून तरी कुठलाही वाईट अनुभव आलेला नाही शिवाय खासदार श्रीकांत शिंदे आणि मोठे साहेब पाठीशी असल्याने पक्षात काम करायला फार अडचण येत नाही. मित्र आणि पक्षाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने ही सर्व स्मरण यात्रा घडली.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात प्रचंड पोटेन्शियल (potential) आहे राष्ट्रीय नेता होण्याचे त्यादिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. सिन्दुर ऑपरेशन नंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या सारख्या तरुण खासदारांवर विश्वास ठेवून देशाचे नेतृत्व जगात करण्याची संधी दिली त्यामुळे त्यांचे नाव देशाच्या राष्ट्रीय पटलावर पुढे आले. उच्च शिक्षित आहे, संधी ओळखण्याची त्यांच्यात गुण आहे आणि धाडस करण्याची क्षमता एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखी आहे त्यामुळे श्रीकांत शिंदे हे भारतीय राजकारणातील लंबी रेस का घोडा आहे.
त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य चिंतितो. कुठेही काही खाऊन आरोग्य खराब करू नका आणि राग येणे काही गोष्टीचा स्वाभाविक आहे, शेवटी हे राजकारण आहे प्रत्येक व्यक्ती अपेक्षा घेऊन आलेला असतो, त्यापूर्ण नाही झाल्या की विपरीत वागतो, रागाला आपले शस्त्र बनवा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरा. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा, कल्याण हो
