धक्कादायक ! ठाणे पोलिसच आरोपीच्या पिंजऱ्यात ?
साकेत येथील कांदळवनांचा ह्रास व पाणथळ क्षेत्रातील भरणी प्रकरण भोवणार
ठाणे : ठाण्यातील रुस्तमजी गृहप्रकल्पाच्या येथून साकेत पोलीस ग्राउंडच्या बाजूने तसेच राबोडी स्थित आकाशगंगा रहिवासी संकुलाच्या पाठीमागील भागातून एक नैसर्गिक नाला पुढे ठाणे खाडीत येऊन मिळतो. येथील सर्व्हे क्रमांक ३८६ च्या ४ भागातील सुमारे १० हेक्टर जमिनीच्या ७/१२ वर भोगवटादार म्हणून पोलीस आयुक्त ठाणे अशी नोंद आहे. संबंधित क्षेत्र हे सीआरझेड वर्ग १ तसेच सीआरझेड वर्ग १ ब असून नाल्याच्या बाजूने विस्तीर्ण कांदळवन अस्तित्वात आहे. येथील समृद्ध कांदळवनाची कत्तल होत असल्याचे निदर्शनास आणूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने वाद उद्भवला असून हे प्रकरण हरित लवादाकडे गेल्यास संबधित पोलिस अधिकारी गोत्यात येऊ शकतात.
दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आकाश गंगा संकुलातील रहिवाश्याना येथील खारफुटीवर भराव टाकला जात असल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी ठाणे तहसीलदार तसेच राबोडी पोलीस ठाणे यांचेकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली, तसेच ठाणे तालुका कांदळवन समिती सदस्य जोशी यांनादेखील अवगत केले. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी वन विभागाच्या कांदळवन कक्षाने येथे स्थळपाहणी केली. त्यानंतरही येथील कांदळवनांवर भरणी थांबत नसल्याचे निदर्शनास आल्याने कांदळवन समिती सदस्य रोहित जोशी यांनी २५ नोव्हेम्बर २०२५ रोजी इमेल द्वारे कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय पाणथळ तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल केली. कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार तक्रारदार तसेच महसूल विभाग, कांदळवन कक्ष, पोलीस प्रशासन तसेच समिती सदस्यांच्या उपस्थितीत नव्याने स्थळपाहणी करण्यात आली. यावेळी सदस्यांना ऍव्हिसेनिआ मरीना जातीचे अनेक तिवरांचे वृक्ष अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. काही तोडलेल्या वृक्षांच्या सुकलेल्या फांद्या तसेच काही जिवंत वृक्ष मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेले आढळून आले. सदर गंभीर निरीक्षणे नोंदवून वन विभागाच्या कांदळवन कक्षाने सविस्तर अहवाल तयार केला. दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही भरणी थांबत नसल्याचे पाहून कांदळवन कक्षाकडे कारवाईबाबत विचारणा केली असता त्यांनी सामान्य प्रशासन विभाग, ठाणे पोलीस आयुक्तालय यांनी दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी पत्राद्वारे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सदर जमिनीवर मियावाकि पद्धतीने १८००० रोपट्याचे रोपण करण्याबाबत परवानगी मागितली असल्याबाबत अवगत केले. या सर्व गंभीर प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांनी आमच्याकडून अशी कोणतीही परवानगी ठाणे पोलिसांना दिली नसल्याचे सांगितले तसेच दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी ठाणे जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी व उपयुक्त, ठाणे महानारपालिका यांना प्राप्त तक्रारींची शहानिशा करून नियमोचित कारवाई करण्याबाबत कळविले. त्यावर ठाणे महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण विभागाने दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी स्थळपाहणी करून सदर जमिनीवर पोलीस विभागातर्फे भरणी होत असल्याचे स्पष्ट करत दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी राबोडी पोलीस ठाण्यात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये रीतसर तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होऊन १५ दिवस उलटूनदेखील राबोडी पोलीस ठाण्याने FIR दाखल न केल्याने पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी आपल्या वकिलांमार्फत दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी ठाणे पोलीस आयुक्तालयाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटिशीत पुढील १० दिवसात दोषी व्यक्ती , संस्थांवर नियमोचित कायदेशीर कारवाई न केल्यास ठाणे पोलीस आयुक्तालयाविरुद्ध न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
पोलिसांचे वृक्षलागवडीचे अजब मिशन
खारभूमीत जिथे क्षारांचे प्रमाण जास्त असते तिथे तिवर, कांदळ या प्रजाती लाखो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर जगण्यासाठी अनुरूप बनल्या आहेत, त्यांच्याशिवाय इतर कोणतेही वृक्ष खारभूमीत जगू शकत नाहीत त्यामुळे येथील खारभूमीवर अतिक्रमण करून १८००० वृक्ष लावण्याची पोलिसांची भूमिका धक्कादायक आहे.पोलीस या क्षेत्रातील तज्ज्ञ नाहीत, पोलीस प्रशासनाचे मुख्य काम कायदा व सुव्यवस्था राखणे हे असून हरीत क्षेत्र वाढविण्याची जबाबदारी वन विभाग, महानगरपालिका यासारख्या इतर संस्थांची आहे.
