मी ज्या देशात वाढलो तो

हा देश नाही- नसीरुद्दीन शाह

स्वाती घोसाळकर

मुंबई “मी कधीही सत्तेची अंध स्तुती केली नाही, नेहमी प्रश्न विचारले. पण आज प्रश्न विचारणेच देशद्रोह ठरत आहे का?” असा सवाल उपस्थित करीत ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी “हा तो देश नाही, ज्यात मी मोठा झालो; आज नफरत ही दिवसभर चालणारी प्रक्रिया बनली आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

नसीरुद्दीन शाह यांनी नुकताच मुंबई विद्यापीठ येथे होणाऱ्या एका साहित्यिक कार्यक्रमातून अखेरच्या क्षणी वगळण्यात आल्याचा दावा केल्याने मनोरंजन आणि साहित्य विश्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे. उर्दू विभागाच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘जश्न-ए-उर्दू’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवादासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र कोणतेही स्पष्ट कारण न देता हे आमंत्रण रद्द करण्यात आल्याचे नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले असून, त्यांनी ही बाब अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे.

नसीरुद्दीन शाह यांनी याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्राद्वारे संपूर्ण घटना मांडली आहे. त्यांनी नमूद केले की, या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ते उत्सुक होते. मात्र ३१ जानेवारीच्या रात्री फोनवरून त्यांना कळविण्यात आले की त्यांच्या उपस्थितीची आवश्यकता नाही. यानंतर आयोजकांनी प्रेक्षकांना नसीरुद्दीन शाह यांनी स्वतःच कार्यक्रमास येण्यास नकार दिला, असे सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत शाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नसीरुद्दीन शाह यांच्या मते, विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांच्या टीकात्मक वक्तव्यांचा संदर्भ देत ते ‘देशाविरुद्ध उघडपणे बोलतात’ म्हणून त्यांना कार्यक्रमातून हटविण्यात आल्याचे सांगितले. आपल्या पत्रात शाह यांनी देशातील बदलत्या वातावरणाबाबत चिंता व्यक्त करत पाठ्यपुस्तकांतील बदल, विज्ञानाशी छेडछाड, अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले आणि जमावहिंसेसारख्या घटनांचा उल्लेख केला.

हा मुद्दा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, अनेकांनी नसीरुद्दीन शाह यांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले आहे. या प्रकरणामुळे कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी या प्रकरणाला राजकीय रंग चढल्याचे चित्र आहे.

साहित्यकला आणि रंगभूमी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही कलाकाराला त्याच्या राजकीय मतांमुळे मंचापासून दूर ठेवणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *