काय आहे हिमगौरी आडकेंचा विक्रम?
नाशिक महापौर दालनाचा फलक चर्चेत
हरिभाऊ लाखे
नाशिक: महापालिकेत स्थायी समिती सभापती झालेली व्यक्ती कधीही महापौर होत नाही, असा आजवरचा नाशिकचा इतिहास आहे. महापौरपदी विराजमान होत कधीकाळी स्थायी सभापती राहिलेल्या हिमगौरी आहेर-आडके यांनी विक्रम प्रस्थापित केला. महापालिकेच्या स्थापनेपासून आजतागायत एकूण १६ महापौर झाले. हिमगौरी आडके या १७ व्या महापौर आहेत.
नाशिकच्या महापौरपदी शुक्रवारी भाजपच्या हिमगौरी आडके यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सर्वपक्षीय ज्येष्ठ सदस्यांनी अभिनंदनाचे ठराव मांडले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, शहराला उच्चशिक्षित महापौर मिळाल्याची भावना व्यक्त झाली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी आडके यांच्या विक्रमाकडे लक्ष वेधले. महापालिकेची पहिली निवडणूक १९९२ मध्ये झाली होती. तेव्हापासून आजतागायत पालिकेत जे कोणी स्थायी सभापती झाले, ते कधीही महापौर झाले नसल्याचा दाखला त्यांनी दिला. पूर्वी स्थायी सभापती राहिलेल्या आडके या पहिल्याच महापौर आहेत, माजी स्थायी सभापतींबाबतचा आजवरचा इतिहास आडके यांच्या माध्यमातून मोडीत निघाला.
महापालिकेची ही सातवी पंचवार्षिक निवडणूक होती. आजवरच्या १७ महापौरांमध्ये आडके या चौथ्या महिला महापौर आहेत. १९८२ मध्ये महापालिका स्थापन झाली. १० वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर १९९२ मध्ये पहिली निवडणूक झाली. पहिले महापौर म्हणून शांतारामबापू वावरे यांनी धुरा सांभाळली होती. सलग दोन वेळा ते महापौर होते. त्यानंतर पंडितराव खैरे, उत्तमराव ढिकले, प्रकाश मते, वसंत गिते, अशोक दिवे महापौर झाले. नाशिकला पहिल्या महिला महापौर १९९९ मध्ये मिळाल्या.
काँग्रेसच्या विद्यमान खासदार डॉ. शोभा बच्छाव या तेव्हा नाशिकच्या प्रथम नागरिक झाल्या होत्या. पुढे दशरथ पाटील, बाळासाहेब सानप, विनायक पांडे, नयना घोलप, ॲड. यतीन वाघ, अशोक मुर्तडक आणी मागील पंचवार्षिकमध्ये रंजना भानसी आणि नंतर सतीश कुलकर्णी हे नाशिकचे महापौर होते. महापालिकेतील महापौरांच्या दालनात आजवरच्या महापौरांचा फलक आहे. या फलकावर आता आडके यांचे नाव समाविष्ट होईल.
