वाढवण बंदर विकासात स्थानिकांना कामे देणार

भारतीय जनता पक्षाच्या निवेदनानंतर ‘आयटीडी सिमेंटेशन कंपनी’ची ग्वाही

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा

योगेश चांदेकर

पालघरः डहाणू तालुक्यातील वाढवण येथील बंदर विकासाचे काम ‘आयटीडी सिमेंटेशन कंपनी’ने घेतले असून या कंपनीने स्थानिकांना रोजगार द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये आदींनी सुमारे चारशे कार्यकर्त्यांसह कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कंपनीच्या वतीने स्थानिकांना रोजगार देण्याचे मान्य करण्यात आले. दरम्यान, पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही या विषयावर चर्चा करण्यात आली.

वाणगाव येथील ‘आयटीडी सिमेंटेशन’ या कंपनीने वाढवण बंदर विकासाचे काम हाती घेतले आहे. ‘एल अँड टी कंपनी’ची ही उपकंपनी आहे. या कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्याऐवजी बाहेरच्या लोकांना रोजगार दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे राजपूत, भोये यांच्यासह भाजपच्या सुमारे चारशे कार्यकर्त्यांनी तेथे धडक दिली. या वेळी तेथे उपस्थित असलेल्या दहा-पंधरा कर्मचाऱ्यांनी मद्यपानाच्या नशेत सुमारे चारशे कार्यकर्त्यांना रोखून धरले. निवेदन देता येणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे भोये, राजपूत यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी कंपनीच्या कार्यालयात प्रवेश केला व निवेदन दिले.

स्थानिक भूमिपुत्रांना डावलले

या निवेदनात प्रामुख्याने स्थानिकांच्या रोजगाराच्या तसेच कामासंबंधीच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पक्ष प्रणित ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की डहाणू तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले कुशल व अकुशल कामगार वाहतूक व्यवस्था तसेच यंत्रसामग्रीसाठी स्थानिक भूमिपुत्रांना डावलले जाते. अन्य राज्यातील कंत्राटदार, कामगार व वाहनधारकांना प्राधान्य दिले जात आहे, ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या रोजगाराच्या हक्कावर गदा येत आहे. या प्रकल्पासाठी लागणारे सर्व कुशल व अकुशल कामगार फक्त डहाणू तालुक्यातील असावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

कार्यालयीन कर्मचारी स्थानिक हवेत

कामगारांना देण्यात येणारी मजुरी भत्ते व इतर सुविधा कामगार कायद्यानुसार देण्यात याव्यात, कार्यालयीन कामासाठी लागणारे कर्मचारी त्यात कारकून पर्यवेक्षक आदी पदांवर स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, साईट इंजिनिअर, मॅनेजर, सुरक्षा रक्षक आदी पदावर बाहेरील व्यक्ती नेमण्याऐवजी स्थानिक उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी, कार्यालयीन कर्मचारी वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने भाडेतत्त्वावर घेताना डहाणू तालुक्यातील स्थानिक वाहनधारकांकडूनच घेण्यात यावीत आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत.

पुरवठा कंत्राटी स्थानिकांना द्या

प्रकल्पासाठी लागणारी जड वाहने व इतर यंत्रसामग्री; त्यात जेसीबी, हायवा पोकलेन, ट्रॅक्टर आणि टँकर व अन्य वाहने स्थानिकांकडून घेण्यात यावीत. खडी, रेती, डांबर व इतर साहित्याच्या वाहतूक व खणन कामासाठी लागणारी यंत्रसामग्री व पुरवठा कंत्राटे स्थानिकांना देण्यात यावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

दरम्यान, याप्रकरणी जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आयटीडी सिमेंटेशन कंपनी’चे अध्यक्ष गौरव दयाळ, सल्लागार राजीव सिन्हा, उपाध्यक्ष रवीशकुमार सिंह, भरत राजपूत, आमदार भोये, पालघरचे आमदार राजेंद्र गावित, डहाणूचे उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत यांची बैठक झाली. या बैठकीत स्थानिकांचा रोजगार, स्थानिकांचा विकास, जमीन अधिग्रहण, मच्छीमारांच्या समस्या आदीबाबत सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेनंतर गौरव दयाळ यांनी, ‘या प्रकल्पात स्थानिकांना सोबत घेऊन काम करू कोणाच्या हक्कावर गदा न येता सर्वसमावेशक विकास कसा करता येईल, तसेच बैठकीत सूचनाचा विचार करून तात्काळ अंमलबजावणी करू,’ असे आश्वासन दिले.

कोट

‘आयटीडी सिमेंटेशन’ या कंपनीने स्थानिकांना डावलून बाहेरच्या लोकांना रोजगार दिला होता. स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी आम्ही कंपनीच्या कार्यालयात निवेदन देण्यास गेलो होतो; परंतु तिथल्या मद्यपी दहा-पंधरा लोकांनी राडा केला. आम्हाला राडा करायचा असता, तर आम्ही चारशे  लोक होतो; परंतु आम्ही तसे केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ सबका विकास’ ही संकल्पना राबवताना स्थानिकांचा विकास झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.

भरत राजपूत, जिल्हाध्यक्ष, भाजप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *