४२२ किल्ल्यांच्या नावांतून साकारले शिवछत्रपतींचे ऐतिहासिक आविष्कारक चित्र
कल्याण: प्रो. डॉ. दिनेश गुप्ता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या ४२२ किल्ल्यांच्या नावांपासून साकारलेले शिवछत्रपती महाराजांचे एक अद्वितीय व आविष्कारक चित्र निर्माण करून इतिहास, कला आणि संशोधन यांचा अप्रतिम संगम घडवून आणला आहे.
या प्रेरणादायी कलाकृतीची प्रेरणा त्यांना मागील वर्षी मिळाली, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोने ‘जागतिक वारसा’ दर्जा प्रदान केला. त्या क्षणी त्यांनी संकल्प केला की महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले सर्व किल्ले एका चित्रामध्ये साकार करून भावी पिढीसाठी जिवंत इतिहास निर्माण करायचा.
हे संपूर्ण पोर्ट्रेट साकारण्यासाठी डॉ. गुप्ता यांना सलग दोन दिवस लागले. या निर्मितीतील सर्वात महत्त्वाचा व आव्हानात्मक टप्पा म्हणजे ४२२ही किल्ल्यांवर सखोल संशोधन, त्यांची अचूक नावे, ऐतिहासिक संदर्भ आणि त्या सर्वांना शिवाजी महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वात कलात्मकरीत्या रूपांतरित करणे. हे चित्र केवळ एक कलाकृती नसून- हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा दस्तऐवज, भारतीय इतिहासाच्या गौरवाचे दृश्य रूप आणि राष्ट्रप्रेरणेचे जिवंत प्रतीक आहे. प्रो. डॉ. दिनेश गुप्ता यांचा हा आविष्कारक उपक्रम इतिहास, राष्ट्रभक्ती आणि सर्जनशीलतेला नवी दिशा देणारा ठरतो.
