ठाणेकरांनी अनुभवली सुदेश भोसलेंच्या आवाजातील `नजाकत’!

सुयश व्याख्यानमालेत उलगडला ५० वर्षांच्या कारकि‍र्दीचा प्रवास

ठाणे : चित्रपट व संगीत क्षेत्रातील तब्बल ५० वर्षांहून अधिक समृद्ध कारकि‍र्दीत १९ पार्श्वगायक व २८ अभिनेत्यांचे हुबेहुब आवाज काढणाऱ्या सुदेश भोसले यांच्या आवाजातील `नजाकत’ ठाणेकरांनी अनुभवली. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह दिग्गज कलाकार, गायक आणि संगीतकारांचे सूर ऐकताना रसिक जुन्या गीतांमध्ये हरवून गेले.

ठाणे पूर्व येथील सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात सलग २२ व्या वर्षी व्याख्यानमाला भरविण्यात आली आहे. या व्याख्यानमालेत प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्याबरोबर ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडीलकर यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. वयाच्या १४ व्या वर्षी चित्रपटाच्या पोस्टरच्या पेंटरपासून पार्श्वगायकापर्यंत झालेला जीवनप्रवास मांडला. तसेच आपल्या कारकि‍र्दीचे भावविश्व रसिकांपुढे उलगडले. मंडळाचे अध्यक्ष मधुसुदन संजीवा व कार्यवाह सतीश सावंत यांनी स्वागत केले. या वेळी पदाधिकारी समीर चव्हाण, अनंता सुर्वे, गुरु स्वामी यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाला महापौर शर्मिला पिंपळोलकर, माजी आमदार रवींद्र फाटक, नगरसेविका मालती पाटील, प्रकाश कोटवाणी, राहुल लोंढे यांच्यासह मान्यवरांचीही उपस्थिती होती.

आशा भोसले व अमिताभ बच्चन हे दोन `एबी’ आयुष्यात आल्यानंतर जीवन बदलून गेले. आपण मेलोडी मेकर्स ऑर्केस्ट्रामध्ये असताना पंचमदा यांचे वडील सचिनदेव बर्मन यांचे गीत हुबेहुब गायले होते. ते ऐकून आशाताईंनी माझी पहिली शिफारस संगीतकार आर. डी. बर्मन उर्फ पंचमदा यांच्याकडे केली. पंचमदा बाथरूममध्ये असताना आशाताईंनी कॅसेटवर माझे गाणे लावले होते. ते ऐकून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि माझी थेट हाँगकाँग दौऱ्यासाठी निवड केली. पंचमदांनी जलजला चित्रपटात पहिल्यांदा पार्श्वगायनाचीही संधी दिली. आशाताईंनी माझी ९९ टक्के कार्यक्रमांसाठी निवड केली, याबद्दल सुदेश भोसले यांनी कृतज्ञता व्यक्त केली. `मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटातील एक संवाद बोलल्यानंतर मित्राने मला अमिताभचा आवाज असल्याची प्रतिक्रिया दिली होती. ते लक्षात आल्यानंतर मी अमितजी गाणी म्हणू लागलो. मेलोडी मेकर्समध्ये त्यांची गीते सादर करण्याची संधी मिळाली. अभिनेते शशी कपूर यांच्या `अजूबा’ चित्रपटात संगीतकार लक्ष्मीकांत कुडाळकर यांनी पहिल्यांदा `या अली’ हे गाणे गाण्याची संधी दिली. त्यानंतर अभिनेते शशी कपूर यांनी माझी अमिताभ बच्चन यांनी पहिली भेट घडवली.`जुम्मा चुम्मा दे दे’ हे गीत १९९१ मध्ये पहिल्यांदा गायलो. त्यानंतर अमितजींबरोबरील एकत्रित दौऱ्यानंतर निर्माण झालेला स्नेह हा वर्षानुवर्षे वाढत गेला. माझ्या वाढदिवसाला १२ वाजून १ सेकंदाने पहिला मेसेज हा त्यांच्याकडून येतो. त्यांचा अनेक वर्षांपासून माझ्यावर विश्वास आहे. या दोन व्यक्तींचा स्नेह मला मिळाला, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असे सुदेश भोसले यांनी सांगितले. `कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात बंगालमधील एका स्पर्धकाच्या वडिलांना अमिताभ बच्चन यांनी फोन केला होता. त्यावेळी त्या स्पर्धकाने सुदेश भोसलेंचा आवाज असल्याचे सांगितल्याने अमितजींना धक्का बसला होता.

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पहिल्यांदा मोबाईलवर एका व्हॉईस मेसेजवरून काम करण्याबाबत विचारणा केली. तो मेसेज ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. त्या कार्यक्रमाचे आपण सव्वा रुपया व नारळ असे मानधन घेतले. खुद्द लता मंगेशकर यांचा मेसेज येणे, हा माझ्यासाठी अनमोल क्षण ठरला. त्यांच्याबरोबर अमेरिका-कॅनडामध्येही दौऱ्याची संधी मिळाली. न्यूयॉर्कमध्ये २५ हजार रसिकांसमोर लतादीदींबरोबर `ये कहॉ आ गये हम’ गीत गायले होते, याची आठवण सुदेश भोसले यांनी सांगितली.

आतापर्यंत ४० वर्षांहून अधिक काळात १९ पार्श्वगायक व २८ अभिनेत्यांचे हुबेहुब आवाज काढले. एका कंपनीच्या हिंदी जाहिरातीला अमिताभ बच्चन यांचा आवाज आहे. तर इतर भाषांतील जाहिरातींना माझ्याकडून आवाज दिला गेला, असे सुदेश भोसले यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी विविध जु्न्या प्रसिद्ध गायकांची गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. आपण कारकिर्दीच्या सुरुवातीला स्वच्छतागृहात दोन तास गाण्यांचा रियाज करीत होते, असा किस्साही सुदेश भोसले यांनी सांगितला.

ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडिलकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत विविध आठवणी व संदर्भ देत सुदेश भोसले यांना बोलते केले. त्यांच्या निवेदनाला रसिकांची पसंती मिळाली.

सुयश मंडळाचे पदाधिकारी अमित नागरे यांच्याकडून माझ्या कार्यक्रमासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला जात होता. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे मला ठाणेकरांबरोबर गप्पा मारता येत आहेत, याबद्दल सुदेश भोसले यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमित नागरे यांचे कौतुक केले.

चौकट

`एका वेगळ्या दुनियेत नेण्याची जुन्या गीतांमध्ये ताकद’

गायिका लता मंगेशकर, आशा भोसले, मुकेश, मोहम्मद रफी, किशोर कुमार, हेमंतकुमार, सचिनदेव बर्मन, कुंदनलाल सहगल यांच्यासारखे गायक व संगीतकार म्हणजे मनुष्य नव्हे तर अवतार आहेत. त्यांची गाणी दोन तास लावून ऐकल्यास एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाण्याची ताकद या गाण्यांमध्ये आहे, असे मत सुदेश भोसले यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *