केडीएमसी क्षेत्रात साकारणार ऑटिझम व्हिलेज
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा एक आगळावेगळा उद्यान प्रकल्प
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने एक आगळा वेगळा प्रकल्प साकारला जात असून यामध्ये आता महापालिका क्षेत्रातील बारावे रिंग रोड लगत परिसरात ऑटिजम व्हिलेज साकारले जात आहे. हे ऑटिजम व्हिलेज व्हिलेज सुमारे १२७७२ चौ मी इतक्या परिसरात तयार होत असून ऑटिजम व्हिलेज अंतर्भूत असलेल्या उद्यानात एका बाजूस ऑटिजमग्रस्त मुलांसाठी ऑटिजम व्हिलेज आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकांसाठी उद्यान साकारले जात आहे. या ऑटिजम व्हिलेज मध्ये स्वमग्नता असणाऱ्या मुलांसाठी संवेदी उद्यान, संवेदी मार्ग, संवेदी खेळाची उपकरणे, ध्यान केंद्र, उपचार केंद्र आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आहेत. यामुळे महापालिका आणि एमएमआर रिजन मधील ऑटिजम रुग्णांना थेरेपी सुविधा उपलब्ध होणार आहे .
उर्वरित भागात भव्य उद्यान , आधुनिक कारंजे, बास्केटबॉल कोर्ट ,एम्म्पोथिएटर, मियावाकी जंगल, स्केटिंग रिंग, जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक, कॅफेटेरिया , टॉयलेट, सोलर सिस्टम अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे हे ऑटिझम व्हिलेज मेरी रियालिटी या विकासकांमार्फत अमिनिटी टीडीआर मधून तयार होत असून महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी याठिकाणी पाहणी करून २ एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम जागरूकता दिनाला या ऑटिझम व्हिलेजचे लोकार्पण होण्याच्या दृष्टीने कामकाज पूर्ण करण्याबत संबंधितांना निर्देश दिले. तसेच दर सप्ताहात स्थळपाहणी करून आढावा घेतला जाईल असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी सहा संचालक नगररचना संतोष डोईफोडे, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव व विकासक सुदेश मोर्यांनी, जय लालवानी, सुनील पुनेजा, दिलीप पाठारे व कन्सल्टंट सूरज पाटील उपस्थित होते.
